बेकायदेशीर माती उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

२ मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 26, 2026 16:42 PM
views 69  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील झाराप येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी बेकायदेशीरपणे मातीचे उत्खनन केले जात असल्याचा खळबळजनक आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाने केला आहे. याप्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास येत्या २ मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

झाराप (ता. कुडाळ) हद्दीत सध्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मातीची आवश्यकता असून, ती बाहेरून आणली जात आहे. मात्र, ही माती आणताना शासनाची कोणतीही रॉयल्टी न भरता, उड्डाणपुलाच्या नजीकच बेकायदेशीरपणे उत्खनन केले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या अवैध उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. महसूल प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, संबंधित ठेकेदार किंवा व्यक्तींवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये. या प्रकारामुळे स्थानिकांमधून आणि सामाजिक संघटनांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महासंघाच्या प्रमुख मागण्या :

ज्या ठिकाणी मातीचे उत्खनन होत आहे, त्या जागेचा तातडीने पंचनामा करण्यात यावा.

उत्खनन केलेल्या मातीचे प्रमाण मोजून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी.

उड्डाणपुलासाठी वापरण्यात आलेल्या मातीचाही स्वतंत्र पंचनामा करावा.

जर या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाकडून योग्य कारवाई झाली नाही, तर ०२ मार्च २०२६ पासून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आमरण उपोषण छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा अॅड. सुहास सावंत यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत कुडाळ तहसील कार्यालयाला सादर करण्यात आली असून, त्यावर 'महसूल सहाय्यक' यांचा अधिकृत शिक्काही उमटला आहे. आता प्रशासन यावर काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.