
सावंतवाडी : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्यावतीने सावंतवाडी येथे कोकण विभाग कार्यकारिणी आणि आढावा बैठक पार पडली. आगामी नगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक मजबुतीकरण या मुख्य उद्देशाने आयोजित केलेल्या या बैठकीत कोकण पट्ट्यातील महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सवालाखे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी शिल्पी अरोरा, श्रीदेवी नाईक, प्रज्योती ताई हंडोरे, साक्षी वंजारी आदि महिला पदाधिकारी उपस्थित होते.
शिल्पी अरोरा आणि संध्या सवालाखे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना वाढती महागाई, महिला सुरक्षा आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्याचे आवाहन केले. तसेच नवीन कार्यकारिणीमधील पद नियुक्तींची घोषणा करून त्यांना सन्मानित करण्यात आले. या बैठकीला पालघर, वसई-विरार, पनवेल, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील महिला जिल्हाध्यक्षा व प्रदेश पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी बोलताना संध्या सवालाखे म्हणाल्या की, कोकणातील प्रत्येक महिलेचा आवाज बुलंद करण्यासाठी आणि काँग्रेसचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये महिला आघाडी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला.










