समांतर शिवलिंगाला वराड ग्रामस्थांचा तीव्र विरोध कायम

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 26, 2026 18:48 PM
views 117  views

सिंधुदुर्गनगरी : मालवण तालुक्यातील वराड-सावरवाड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या स्फटिक शिवलिंग मंदिरावरून ग्रामस्थ आक्रमक झाले असून, गावात आधीपासून स्वयंभू लिंगेश्वर मंदिर अस्तित्वात असताना समांतर मंदिर उभारू नये, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. या प्रकरणी आज ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत उद्या चर्चेसाठी बोलाविले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

गावातील धार्मिक परंपरा, एकोपा आणि शांतता अबाधित राहावी, यासाठी नव्याने सुरू झालेल्या स्फटिक शिवलिंग मंदिरावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्याकडेही निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्यांच्याकडून अपद्याप कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आज ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन सादर केले.  यावेळी श्री देव वेताळ व इतर देवस्थान ट्रस्ट, वराडचे अनिल परब, गुरुनाथ सामंत, गजानन परब, अशोक परब, अमित फाटक, पालटदार गावकर व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

गावात स्वयंभू लिंगेश्वर मंदिर प्रस्थापित असून त्याला ऐतिहासिक व धार्मिक परंपरेची जोड आहे. अशा परिस्थितीत समांतर मंदिर उभारणे योग्य नसून त्यामुळे गावात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच नव्या मंदिराच्या उभारणीसाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आलेल्या माहित. गावातील शांतता व सलोखा कायम राहावा, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, समांतर शिवलिंगाला विरोध करण्याच्या निर्णयावर ग्रामस्थ ठाम असून चर्चेनंतरही भूमिका बदलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.