सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यास निर्बंध !

'फिडींग सेंटर' केली जाणार निश्चित ! | न. प. ॲक्शन मोडवर ; नगरसेवकही आक्रमक !
Edited by: विनायाक गांवस
Published on: February 26, 2026 18:52 PM
views 71  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढली असून नुकतेच एका कुत्र्याने एकाच दिवशी २ चिमुकल्यांसह ५ जणांचा चावा घेतला होता. यामुळे नगरसेवकांनी देखील आक्रमक पवित्रा घेत सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालणाऱ्यांवर निर्बंध लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज नगरपरिषदेत या संदर्भात झालेल्या बैठकीत मिशन रेबीजच्या मदतीनं भटक्या कुत्र्यांचा उपद्रव नागरिकांना अधिक होऊ नये तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांचा उच्छाद कमी व्हावा यासाठी नियोजन करण्यात आले. नगरपरिषदेत या संदर्भात आज बैठक पार पडली. यात मिशन रेबीजचे अमित नाईक व सहकारी उपस्थित होते. त्यांच्या सहकार्याने नगरपरिषदेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण लसीकरण तसेच त्यांची इतरत्र सोय करण्यासाठी यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्यांवर निर्बंध आणावेत अशी मागणी नगरसेवकांनी प्रशासनाकडे केली. त्यानुसार नगरपरिषद प्रशासनाकडून लवकरच शहरात 'फिडींग सेंटर' निश्चित केली जाणार आहेत. या व्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यास मज्जाव करण्यात येणार आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. 

नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत देखील हा मुद्दा चर्चेला आला होता. सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्या एका महिलेनं थेट आरोग्य निरीक्षकांनाच धमकी दिल्याचे नगरसेवक तौकीर शेख यांनी सभागृहात सांगितले होते‌. यातच भटवाडी येथील दोन परप्रांतीय महिलांकडून शहरातील बाजारपेठेसह सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खायला घातलं जात. त्यांना नगरपरिषदेत बोलावून घेत आज समज देण्यात आली. मात्र, त्यांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना फैलावर घेतलं. फिडींग सेंटर व्यतिरिक्त इतर सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. यानंतर मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे शहरात ठरवून दिलेल्या जागांव्यतिरीक्त सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्यथा, कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नगरपरिषदेत आज झालेल्या या बैठकीस सभापती आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर, मोहिनी मडगावकर, निलम नाईक, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, तौकीर शेख, देवा टेमकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, आरोग्य निरीक्षक विनोद सावंत आदी  उपस्थित होते.