
कुडाळ : तालुक्यातील झाराप मतदान केंद्रावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी दरम्यान लोकशाहीवरील विश्वास अधोरेखित करणारी एक प्रेरणादायी घटना घडली. झाराप केंद्र शाळेतील मतदान केंद्रावर १०१ वर्षीय लीलावती लक्ष्मण हरमलकर यांनी स्वतः चालत येत आपला मतदानाचा हक्क बजावला आणि लोकशाही वरील आपली निष्ठा अधोरेखित केलीय. सकाळपासूनच झाराप परिसरात मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. तरुणांसह वयोवृद्ध मतदारही उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले होते. यामध्ये हरमलकर आजींचा सहभाग सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. मतदानानंतर त्या म्हणाल्या, “मी दरवर्षी हक्काने मतदान करत आले आहे. लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.”
त्यांच्या या शब्दांनी आणि कृतीने उपस्थित मतदारांना नवी प्रेरणा मिळाली. १०१ वर्षांचे वय असूनही लोकशाहीप्रती असलेली त्यांची निष्ठा अनेक तरुणांसाठी आदर्श ठरत आहे.










