कुडाळ तालुक्यात दुपारी ३:३० पर्यंत ४७.४३ मतदान

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 07, 2026 16:32 PM
views 33  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, कुडाळ तालुक्यात मतदारांमध्ये म्हणावा तसा उत्साह दिसून येत नसून दुपारी ३:३० वाजेपर्यंत तालुक्यात केवळ ४७.४३% इतकेच मतदान झाले आहे. मतदानाची आकडेवारी (दुपारी ३:३० वाजेपर्यंत): मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

स्त्री मतदार: २६,२५५

पुरुष मतदार: २९,०५८

एकूण मतदान: ५५,३१३

टक्केवारी: ४७.४३%

तालुक्यात मतदानाचा टक्का घसरण्यामागे काही महत्त्वाची कारणे चर्चेत आहेत. सध्या  कोकणची महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या आंगणेवाडीची जत्रा (९ फेब्रुवारी) जवळ आल्याने भाविक आणि ग्रामस्थ त्या तयारीत व्यस्त आहेत. तसेच, आज मतदानाच्या दिवशी असलेले लग्नाचे मुहूर्त हे देखील कमी मतदानाचे एक मुख्य कारण मानले जात आहे. अनेक मतदार लग्नसराईसाठी बाहेरगावी गेल्याने मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

मतदानासाठी आता केवळ शेवटचे काही तास शिल्लक आहेत. सकाळपासूनची संथ गती पाहता, या निवडणुकीत मतदानाचा टक्का ६०% पार जाणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मतदार उर्वरित वेळेत मतदार केंद्रांवर गर्दी करतात की कुडाळचा टक्का यंदा घसरलेलाच राहतो, हे संध्याकाळी स्पष्ट होईल.