पर्यावरण रक्षणाचा संदेश देत 'पावशी'त सजला सेल्फी पॉईंट

मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 07, 2026 14:33 PM
views 53  views

कुडाळ :  लोकशाहीच्या उत्सवात पर्यावरणाचे रक्षण करण्याचा आगळावेगळा संदेश कुडाळ तालुक्यातील पावशी-ढवणवाडी येथील मतदान केंद्राने दिला आहे. येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 'सखी मतदान केंद्रावर' उभारण्यात आलेला पर्यावरणपूरक सेल्फी पॉईंट सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. नैसर्गिक साहित्याचा कल्पक वापर "पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, मतदान करा आणि लोकशाही बळकट करा" असा मोलाचा संदेश या पॉईंटच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या सेल्फी पॉईंटचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूंचा वापर न करता पूर्णपणे नैसर्गिक साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने:

बांबूचे सुबक सांगाडे, माडाची झावळे, नारळाच्या करवंट्या या स्थानिक साहित्यातून हा सेल्फी पॉईंट अतिशय कलात्मकरीत्या साकारण्यात आला आहे. मतदारांचे वेधले लक्ष मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरच उजव्या बाजूला हा सेल्फी पॉईंट उभारल्यामुळे केंद्रात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मतदाराचे लक्ष आपसूकच तिकडे वळत आहे. आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदार या विशेष पॉईंटवर आपला आनंद सेल्फीच्या माध्यमातून टिपताना दिसत आहेत. केवळ तरुणच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकही या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. प्रशासनाच्या या कल्पक उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होत असून, 'पर्यावरणस्नेही निवडणूक' ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.