
कुडाळ : मुंबई - गोवा महामार्गावर कुडाळ जवळ ब्लू डार्ट सर्विस कुरिअर वाहन (कंटेनर) लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास पणदूर परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार याबाबत कंटेनर चालक मनोज कुमार पाल एस ओपन बैचेनलाल (वय ३१, रा. मिर्जापूर, उत्तर प्रदेश) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते कंटेनर क्रमांक MH04- LE - 0312 घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना बलेनो MH 07- AS - 0194 कार मधून आलेल्या संशयित आरोपींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. लुटीच्या उद्देशाने कुरिअर वाहन अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने वाहन न थांबवल्याने संशयित आरोपींनी कंटेनरवर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संशयित सुजल सचिन पवार (रा. झाराप, ता. कुडाळ), राहुल अमित शिरसाट (रा. कुडाळ), प्रशांत नितीन सावंत व प्रज्वल नितीन सावंत (रा. वेताळ बांबर्डे, ता. कुडाळ), मंदार सोनू उमळकर (रा. कुडाळ) आणि राहुल सदानंद नलावडे (रा. पावशी, ता. कुडाळ) यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली. याबाबतचा पुढील तपास API जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पळून जाणा-या बलोने कारने मध्यरात्रीच्या सुमारास कुडाळ शहरातील गीता हॉटेल समोरील मुख्य रस्त्यालगतच्या एका दुकानाला धडक दिली. यात दुखानासह जिल्हा बँकेच्या एटीएम केंद्राचेही नुकसान झाले असून, तेथेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका वॅगनार कारलाही त्या बलेनोची धडक बसली. दरोडा व अपघात असे दोन गुन्हे कुडा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले आहेत










