
सावंतवाडी : निर्वाण फाऊंडेशन, नाशिक आयोजित सावित्रीज्योती "राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा" नाशिक येथे संपन्न झाला. या समारंभामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन दशावतार लोककलेमध्ये नावलौकिक प्राप्त केलेले दशावतारी कलाकार अभिनय सम्राट नितीन रामा आसयेकर यांच्या दशावतार कलेतील योगदानाची दखल घेऊन त्यांना संस्थेच्या वतीने सावित्रीज्योती सन्मान पुरस्कार २०२२" हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर निर्वाण फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश आंबेडकर, प्रमुख अतिथी पश्चिम आफ्रिका सामाजिक कार्यकर्ते किटॅनो दज्ता , पश्चिम आफ्रिका स्काॅलर गॅब्रियल दा सिल्वा, विशेष अतिथी अभिनेता ( झी मराठी फेम ) प्रशांत गरूड, अभिनेत्री (कलर्स मराठी फेम ) पल्लवी पटवर्धन, संस्थेचे पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभाला नितीन आसयेकर फॅन क्लबचे सदस्य राजेश म्हापणकर, पांडूरंग पालव व स्वप्निल पालव उपस्थित होते.
यावेळी नितीन आसयेकर यांनी संस्थेचे आभार मानत अशा पुरस्कारामुळे लोककलेसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंतांना प्रोत्साहन मिळत असून नवीन कलाकारांना यातून नवी उमेद मिळेल तसेच विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा हा मोठा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली.