
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील उपक्रमशील मुख्याध्यापक रघुनाथ अंकुश घोगळे यांची निवड करण्यात आली होती. शनिवारी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबई येथील रंग शारदा सभागृहात या पुरस्काराचे वितरण झाले.
मुख्याध्यापक रघुनाथ घोगळे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले रघुनाथ अंकुश घोगळे हे अत्यंत उपक्रमशील शिक्षक असून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्तरांवर काम करत आपला शिक्षकी पेशाचा आदर्श जोपासला आहे.
शिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन, राष्ट्रीय एकात्मता, कोकणातील औषधी वनस्पती व त्यांचे वैद्यकीय उपयोग, कोकणातील सामाजिक व सांस्कृतिक परंपरा, राष्ट्रीय छात्र सेना, वृक्ष संवर्धन आणि संगोपन, रक्तदान चळवळ, निसर्ग मित्र समिती अशा विविध विषयांवर काम करीत उपक्रमशील शिक्षक घोगळे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले.
श्री.घोगळे यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संदीपशेठ तेली, खजिनदार संतोष वरेकर यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.