
कुडाळ : 'कोकणसाद'ने सर्वप्रथम प्रकाशित केलेल्या बातमीची दखल घेत, मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथील बेल नदीच्या पुलावर पडलेले भगदाड दुरुस्त करण्याचे काम अखेर युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा धोका निर्माण झाला होता.
यापूर्वी या भगदाडाकडे दुर्लक्ष केले जात होते आणि केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जात होती. मात्र, 'कोकणसाद'ने ही गंभीर परिस्थिती समोर आणल्यानंतर प्रशासनाला जाग आली. २१ ऑगस्ट रोजी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, यावेळी दर्जेदार काम होईल अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची सद्यस्थिती अत्यंत बिकट आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासाचा वेळ वाढत असून, अपघातांचा धोकाही वाढला आहे. विशेषतः कोकणातील चाकरमानी गणेश चतुर्थीसाठी मोठ्या संख्येने गावी येत असतात. त्यामुळे, चतुर्थीपूर्वी हे सर्व खड्डे भरून रस्ता सुस्थितीत आणला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रवासाला येणारे अडथळे आणि संभाव्य धोके यामुळे नागरिक चिंतेत आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन, गणेश चतुर्थीपूर्वी महामार्ग सुस्थितीत आणावा, अशी मागणी जनसामान्यातून जोर धरत आहे.