
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीमध्ये बुधवारी 9 जुलै 2025 रोजी पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृतीपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले. या सेमिनारसाठी प्रमुख वक्ते म्हणून कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रसाद गावडे यांचा संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित या सेमिनारमध्ये रानमाणूस प्रसाद गावडे यांनी उपस्थितांना कोकणातील जैवविविधता अतिशय अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत स्पष्ट केली. कोकणातील निसर्ग संपदा, खाद्य संस्कृती ,पारंपारिक जीवनमान, नैसर्गिक अधिवास यांचे महत्त्व विशद केले.याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत , एस .पी.के.कॉलेजचे प्रभारी प्राचार्य श्री ठाकूर सर ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व बहुसंख्य पालक उपस्थित होते.
यावेळी आधुनिक जीवनशैलीच्या आकर्षणापायी तसेच स्वार्थापोटी निसर्गाला ओरबाडणे व निसर्गापासून दूर जाणे याबद्दलची खंत व्यक्त करताना येथील स्थानिक लोकसंस्कृती व पर्यावरण राखण्याची जबाबदारी प्रत्येक कोकणी माणसाची व विशेषतः युवा वर्गाची आहे हे त्यांनी अधोरेखित केले. येथील युवा वर्गाने पर्यावरण पूरक जीवनशैलीचे व येथील निसर्ग संपन्नतेचे महत्व वेळीच लक्षात घेऊन येथील जैवविविधतेवर आधारीत व्यवसायाच्या संधी हेरून निसर्गाच्या सानिध्यात दर्जेदार व समाधानी जीवन व्यतीत करावे असे आवाहन श्री. गावडे यांनी केले. निसर्ग राखला तरच आपले अस्तित्व आहे हे ध्यानी ठेवून माणसाची कृती ही निसर्गाला राखणारी, त्याचे जतन करणारी असावी असेही त्यांनी स्पष्ट केले. 21 व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना कोकणी माणसाने लोभापायी किंवा कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या जमिनी शाबूत ठेवणे व येथील निसर्गाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी लक्षात ठेवून येथील शेती ,मृदा, प्राणी ,पक्षी ,डोंगर ,पाणी यांच्या राखणदाराची भूमिका पार पाडावी असे तळमळीने सांगितले. विद्यार्थ्यांनी निसर्गाला समजून घेण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात रहावे, काम करावे आणि निसर्ग समजून घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.तद्नंतर राजेसाहेब खेमसावंत यांनी रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या कार्याची प्रशंसा केली.तसेच विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम नेहमीच राबविले जातील याची खात्री दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक गोविंद प्रभू यांनी केले तर योगेश चव्हाण , प्रशांत गावकर, कुलदीप कालवणकर, भूषण परब इत्यादी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.