
कुडाळ : उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे आणि ग्रामपंचायत नानेली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या जलसंधारण अभियान २०२४ अंतर्गत कुडाळ तालुक्यातील नानेली या गावात नदीपात्रात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रफुल्ल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी च्या स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या सहभागातून कोंकण विजय वनराई बंधारा बांधण्यात आला.
या बंधाऱ्यामुळे वाहून जाणारे पाणी अडवून आजूबाजूच्या विहिरीतील जल पातळीत लक्षणीय वाढ होऊन लगतच्या शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे.
बंधाऱ्याचे उद्घाटन गावच्या सरपंच वंदना आरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी ग्रामसेविका चेतना म्हाडगुत, पोलीस पाटील संजय धुरी, ग्रामपंचायत सदस्य मुकुंद सावंत, विनायक मेस्त्री, माजी सदस्य शिवाजी आरेकर व काही ग्रामस्थ उपस्थित होते. प्राध्यापक वर्ग, अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनीच बंधारा बांधणीच्या कामात श्रमदान केले. या जलसंधारण मोहीम राबविल्याबद्दल सरपंच सौ.वंदना आरेकर यांनी उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे गावच्यावतीने विशेष कौतुक केले व महाविद्यालयाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.