कुडाळात उद्यापासून कोकण समर फेस्टिव्हल !

Edited by:
Published on: April 24, 2025 16:00 PM
views 225  views

कुडाळ : छोट्या व्यावसायिकांना आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी “कोकणची चेडवा” ग्रुपच्या वतीने कुडाळ येथे 'कोकण समर फेस्टिव्हल २०२५' या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २५ ते रविवार २७ एप्रिल या कालावधीत नगरपंचायत पटांगण, बाजारपेठ, कुडाळ येथे संध्या. ४ ते रात्री १० वा. या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती संयोजक मोनाली वर्दम, गौरी सावंत, हर्षदा पडते व अपर्णा शिरसाट यांनी दिली. 

लघुउद्योग, गृहउद्योग आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कोकणातील युवा कलाकारांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक मोनाली वर्दम, गौरी सावंत, हर्षदा पडते, अपर्णा शिरसाट यांनी केले आहे. 

प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष असून, यामध्ये कोकणासह मुंबई-पुणे परिसरातून आलेले सहभागी खाद्यपदार्थ, गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, मसाले, दागिने, कपडे, कोकणी मेवा, चटया, पुस्तके, घरगुती उत्पादने इत्यादी प्रकारांचे स्टॉल्स लावणार आहेत युवकंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या चित्रकला, हस्तकला, हस्तनिर्मित वस्तू यांचे प्रदर्शन आणि विक्रीसुद्धा या महोत्सवात होणार आहे. २५ एप्रिल रोजी सायं. ६ वा. शिरोडा येथील अनिता कराओके यांचा लाईव्ह सिंगिंग शो, २६ रोजी सायं. ६ वा. लहान मुलांसाठी किड्स टॅलेंट शो स्पर्धा व ७.३० वा. शिवकालीन युद्धकला सादरीकरण, रात्री ८ वा. महिलांसाठी फनी गेम्स, २७ रोजी सायं. ६ वा. पेट फॅन्सी ड्रेस स्पर्धा, ७ वा. सर्व वयोगटातील जोड्यांसाठी 'जोडी नंबर १' डान्स स्पर्धा, तसेच, लहान मुलांसाठी गेमिंग झोन ची व्यवस्था करण्यात आली आहे. 

या फेस्टिवलमुळे मनोरंजन, खरेदी आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद हे सर्व एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे, सर्वानी या महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.