सिंधुदुर्गचे पर्यटन सर्कीट विकसित व्हायला हवे : के. मंजुलक्ष्मी

कणकवली इथं कोकण प्रादेशिक पर्यटन परिषद
Edited by: उमेश बुचडे
Published on: July 21, 2023 13:33 PM
views 614  views

कणकवली : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून १९९९ साली जाहीर झाला आहे. मात्र, अजूनही या जिल्ह्यात गोव्याप्रमाणे दर्जेदार व सर्वोत्तम सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी शासन, प्रशासन, पर्यटन व्यावसायिक व जनतेच्या समन्वयातून सर्वसमावेशक धोरण तयार करून त्यानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. सिंधुदुर्गात येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांना ही सर्व पर्यटन स्थळे पाहता यावीत यासाठी सिंधुदुर्गचे पर्यटन सर्कीट विकसित व्हायला हवे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. 

कणकवली येथे पर्यटन संचालनालयामार्फत कोकण प्रादेशिक पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रजित नायर, प्रोबेशनल आयएएस ऑफीसर करिश्मा नायर, कोकण प्रादेशिक पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे, पर्यटन क्षेत्रातील डॉ. मिनल ओक, विष्णू उर्फ बाबा मोंडकर, कमलेश चव्हाण, राहुल कुलकर्णी, संपदा कुलकर्णी, सुहास ठाकूर-देसाई संजय नाईक आदी उपस्थित होते.

के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, सिंधुदुर्गात निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणात आहे. येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीचे कौशल्य विकसित करावे लागेल.महिलांना नाश्ता,जेवण तसेच इतर आवश्यक साहित्य हाताळणीबाबत प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटकांना चांगल्या सुविधा देता येतील. जिल्ह्यात चिपी विमानतळ झाला असून त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे का ? याचा आढावा घेणे आवश्यक आहे. 

हनुमंत हेडे म्हणाले, राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयाने पर्यटन आणि व्यवसायाच्या संधी वाढविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रारंभ आजपासून केला आहे. कोकण प्रदेशाची प्रचंड क्षमता आहे.येथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचे तसेच अद्वितीय सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक गोष्टींची माहिती त्यांना देण्याचे पर्यटन संचलनालयाचे उद्दिष्ट आहे. मुंबईचे गजबजलेले महानगर, लोणावळा आणि महाबळेश्वर हे आकर्षक हिल स्टेशन्स, प्राचीन अजिंठा आणि एलोरा लेणी आणि अलिबाग, आंजर्ले, गुहागर, आरे-वारे, मिठबाव, तारकर्लीसह अन्य समुद्रकिनारे यासारखी प्रसिध्द ठिकाणे राज्यात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने, पर्यटन विभागाने पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक धोरण राबविण्याची योजना आखली आहे. या धोरणामध्ये नवीन पर्यटन सर्किट्सचा विकास, विद्यमान पायाभूत सुविधांची वाढ आणि शाश्वत पर्यटन पद्धतींचा प्रचार यांचा समावेश आहे. याशिवाय ट्रॅव्हल एजन्सी, टूर ऑपरेटर आणि स्थानिक समुदायांसह विविध भागधारकांसह, अभ्यागतांसाठी अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी आणि क्षेत्राची आर्थिक वाढ व सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पर्यटन विभाग आदरातिथ्य, प्रवास, खाद्यपदार्थ क्षेत्र आणि हस्तकला या क्षेत्रांमध्ये व्यापाराच्या संधींना चालना देण्यासाठी उद्योगातील नेते, चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि व्यापार संघटनांशी सक्रियपणे सहभागी होईल. असेही ते म्हणाले. यावेळी प्रजित नायर,संजय नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले. पर्यटन क्षेत्राशी निगडीत नामांकीत सहल आयोजक,साहसी आणि कृषी पर्यटन युनिट्ससह प्रवासी, व्यवसायिक यावेळी उपस्थित होते. – पर्यटन अधिकाऱ्याची गरज! सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे.मात्र,येथे पर्यटन विकास अधिकारी नाही. तशा अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे.असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी यावेळी सांगितले. 

पर्यटन क्षेत्रातील डॉ. मिनल ओक, विष्णू उर्फ बाबा मोंडकर, सतीश लळीत, कमलेश चव्हाण, राहुल कुलकर्णी, संपदा कुलकर्णी, सुहास ठाकूरदेसाई यांच्यात कोकण पर्यटन विकासाच्या अनुषंगाने पॅनेल चर्चा झाली. परिषदेला सिंधुदुर्गसह कोकणातील पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.