सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे रेल्वे स्थानकाजवळील मालपे बोगद्यात पावसामुळे पाणी भरल्यामुळे कोकण रेल्वे पूर्णतः ठप्प झाली आहे. काही गाड्या रद्द करण्यात आल्यात. तर काहींचा मार्ग बदलण्यात आला आहेत. त्यामुळे काही गाड्या सावंतवाडी स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी स्थानकावर जाऊन प्रवाशांना गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली आहे. या रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या दृष्टीने त्यांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य केले आहे. सावंतवाडी स्थानकावरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपस्थित पोलीस, रेल्वेचे अधिकारी तसेच कदंबा महामंडळ गोवा आणि महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या बसेस ना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मिहिर मठकर, भूषण बांदिवडेकर, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर, विहंग गोठोसकर आदी उपस्थित होते.