प्रवाशांच्या मदतीला धावली कोकण रेल्वे प्रवासी संघटना

Edited by: विनायक गांवस
Published on: July 16, 2024 09:40 AM
views 244  views

सावंतवाडी : नातुवाडी (खेड) बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पूर्ण कोकण रेल्वे ठप्प झाली होती. यामुळे रेल्वे गाड्या ह्या विविध स्थानकावर थांबवण्यात आल्या. गरीब रथ एक्स्प्रेस ही सावंतवाडी स्थानकात थांबवली होती. त्यागाडी ने प्रवास करणारे  ७०० पेक्षा अधिक प्रवासी अडकले होते. स्थानकावर असलेल्या अपुऱ्या खान-पानाच्या सुविधेमुळे त्रस्त झालेले होते. ट्रेन मधले पाणी देखील संपले होते. अशावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेन मदतीचा हात पुढे केला.


संघटनेकडून कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना फोन करून गरीब रथ एक्स्प्रेस मध्ये पाणी भरायला सांगितले. अँब्युलन्सची देखील व्यवस्था संघटनेने केली. सर्व लोकांना या प्रवाशांचा मदतीसाठी धावून या असे आवाहन देखील केले. त्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद देत अल्पावधीतच १० हजार रुपये जमा केले. या रक्कमेतून गरीबरथ एक्स्प्रेस मधील प्रवाशांसाठी पाण्याच्या बॉटल्स, बिस्किटे आदी असे सुमारे ७०० लोकांना पुरणारे समान स्थानकावरील प्रवाशांना कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून देत प्रवाशांना धीर देण्यात आला. यावेळी सचिव मिहीर मठकर , संपर्क प्रमुख भुषण भरत बांदिवडेकर ,खजिनदार विहंग गोठोसकर ,राज पवार आदी उपस्थित होते.