
सावंतवाडी : राज्य सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस महामार्गाला कोकणातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करावा असे आवाहन निरवडे येथील प्रगतशील शेतकरी संतोष गावडे यांनी केले आहे. तर हा प्रकल्प कोकणचा विकास करणार की कोकणी जनतेचा भकास करणार असाही सवाल त्यांनी केला आहे.
श्री.गावडे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्र दिले आहे त्यात असे म्हटले आहे की, कोकण ग्रीनफिल्ड एक्सप्रेस महामार्ग नवीन सहापदरी महामार्ग प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. तसेच अनेक ठिकाणी कोकणात ड्रोनमार्फत त्याचा सर्वे ही करण्यात आला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जवळपास 1100 हेक्टर जागेवर हा महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गामुळे सर्व सामान्य जनतेला अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबई गोवा महामार्ग, रेडी संकेश्वर सागरी महामार्ग आणि आता कोकण एक्सप्रेस महामार्ग असे तीन महामार्ग अवघ्या वीस किलोमीटरच्या अंतरात तयार करून कोकणचा विकास करणार की कोकणी जनतेचा विकास करणार असा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी कोकणातील शेतकऱ्यांकडे तुटपुंज्या जमिनी त्यात भात आणि बागायत यापलीकडे कोकणातील शेतकऱ्यांकडे कोणतेही जमीन नाही त्यात हजारो हेक्टर जर या तीन तीन महामार्गाने संपादित केली तर कोकणी माणूस पूर्णपणे उध्वस्त होईल या ठिकाणी कोणतेही रोजगार देणारे प्रकल्प नसताना या महामार्गाचा कोणताही फायदा सर्वसामान्य जनतेला होणार नाही ज्याप्रमाणे कोकण रेल्वे चा पूर्ण फायदा दक्षिणेकडील राज्यांना होतो तशाच प्रकारे या महामार्गांचा फायदा पूर्णपणे गोवा राज्याला होणार आहे. या कोकण एक्सप्रेस महामार्गावर एवढे कोटी खर्च करण्यापेक्षा मुंबई गोवा महामार्ग कराड निपाणीच्या धरतीवर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तर कोकणातील शेतकऱ्यांनी महामार्गाच्या मोबदल्याच्या मागे न लागता सर्वांनी आपल्या अस्तित्व राखण्यासाठी या महामार्गाला विरोध करावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.