पदवीधरांच्या पदरी काय ?

कोकण पदवीधरसाठी १३ उमेदवार रिंगणात
Edited by: विनायक गांवस
Published on: June 22, 2024 09:52 AM
views 336  views

अँड.डावखरे, कीर, निमकरांची प्रचारात आघाडी !

सावंतवाडी : लोकसभा निकालानंतर 'पदवीधर' निवडणूकीचे वारे समृद्र किनारपट्टी लगत असलेल्या कोकण मतदारसंघात वाहू लागले आहेत. तब्बल १३ उमेदवार या निवडणुकीसाठी रिंगणात असून आपआपले नशीब आजमावत आहेत. यात महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अँड. निरंजन डावखरे, महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यात थेट लढत होणार आहे. २ लाख २३ हजार २२५ पदवीधर मतदार आपला आमदार २६ जूनला निवडणार आहेत‌. सद्यस्थितीत अँड. निरंजन डावखरे, रमेश कीर यांच्यासह अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. 


पदवीधर मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदार हे ठाणे जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ठाणेकर मतदारांच्या हाती भावी पदवीधर आमदार निवडून आणण्याची दोर असणार आहे. तर तळकोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा टर्निंग पॉईंट ठरणार आहेत. ४१ हजारांहून अधिक मतदार हे या दोन जिल्ह्यातील आहेत. २६ जून रोजी सकाळी ७ ते सायं. ६ या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. २ लाख २३ हजार २२५ मतदारांमध्ये ९५ हजार ५४७ महिला, तर एक लाख २७ हजार ६५० पुरुष आणि २८ तृतीयपंथी मतदार आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रमेश कीर, महायुतीकडून भाजपचे अँड. निरंजन डावखरे, भीमसेना पार्टीचे विश्वजित खंडारे तर अपक्ष म्हणून अमोल पवार, अरुण भोई (प्राचार्य), अक्षय म्हात्रे, गोकुळ पाटील, जयपाल पाटील, नागेश निमकर, प्रकाश वड्डेपेल्ली, मिलिंद पाटील, ॲड. शैलेश वाघमारे, श्रीकांत कामुर्ती हे १३  उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत मतदारराजा देणार आहे. सद्यस्थितीत विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी प्रचारात मुसंडी मारलेली दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी शेवटच्या काही दिवसात तळकोकणात ठाण मांडून प्रचारात आघाडी घेतली. अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी देखील थेट मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. डावखरे, कीर व निमकर सोशल मीडियावरील प्रचारात देखील आघाडीवर आहेत. 

पदवीधरांच्या पदरी काय ?

निवडून आल्यानंतर मिशन एज्युकेशन माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाची पावले ओळखून नवीन शैक्षणिक धोरण आखले आहे. सारे जग आता चौथ्या औद्योगिक क्रांतीला सामोरे जात आहे. जगाबरोबर राहण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. हाय स्पीड इंटरनेट, डेटा व्यवस्थापन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांनी आणलेल्या क्रांतीचे आव्हान पेलण्यासाठी रोजगारात व मनुष्यबळाच्या वापरात आमूलाग्र बदल होणार आहेत. यात नव्या संधी निर्माण होणार आहेत. यासाठी कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रशिक्षण आदी उपक्रम राबवण्याचा संकल्प अँड. निरंजन डावखरे यांनी केला आहे. तसेच NEP राबवण्यासाठी प्रशिक्षण, NEP इन्फ्रास्ट्रक्चर, प्रत्येक शाळा 'ग्रीन स्कूल', पदवीधर शिक्षकांसाठी सेवा व पदोन्नत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पदवीधर शिक्षकांचे वेतनविषयक प्रश्न व पदवीधर शिक्षक समस्या, जुन्या पेन्शन योजनेसाठी प्रयत्न, कृषीआधारित उद्योग-व्यवसाय, एकात्मिक मध धोरण, मत्स्योद्योग धोरण, कोकण वैधानिक विकास महामंडळ स्थापना मागणी, इन्क्युबेशन सेंटर्स आणि अनुभवी मार्गदर्शकांची साखळी, शासकीय इमारतीतील सुविधा, पर्यटन व्यवसायाच्या वृद्धीसाठी प्रयत्नशील राहण्याच आश्वासन महायुतीचे उमेदवार अँड. डावखरे यांनी दिल आहे. 

तर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आग्रही मागणी व पाठपुरावा, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य, शैक्षणिक धोरणांबाबत जागरूक राहू, पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा आवाज बनू,  विधिमंडळातील आयुधांचा वापर करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न, नोकरी हा सध्याचा ज्वलंत प्रश्न, शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात पाठपुरावा, कोकणातील प्रत्येक जिल्हा रोजगार केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त पदवीधरांना रोजगार मिळावा,  एमपीएससीची पदभरती योग्यवेळी व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा,

एमपीएसी व इतर स्पर्धा परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या व प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हानिहाय प्रयत्नशील, जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित करून पदवीधरांना रोजगार, बेरोजगार तरुण आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी लढा देणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी दिलं आहे. त्यामुळे मतदार कोणाला विधानपरिषदेत जाण्याचा उमेदवाराचा मार्ग सुकर करतात ? व आपल्या पदरी काय पाडून घेणार यासह कोणाचे स्वप्न साकारण्यासाठी पदवीधर मदत करणार ? हे पाहावे लागणार आहे‌. 

मतदान कसे करावे ?

मतदान पत्रिकेत उमेदवाराच्या नावाच्या पुढील रकान्यात १ हा अंक लिहून आपले प्रथम पसंतीचे मत नोंदवायचे आहे. मतपत्रिकेबरोबर दिलेल्या पेनचाच वापर करायचा आहे.

मतपत्रिकेवर स्वाक्षरी वा अंगठ्याचा ठसाही उमटवायचा नाही आहे. अद्याक्षरे वा कोणताही शब्द लिहू नये. फक्त, उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यासमोरच १ अंक लिहून मतदान करायचे आहे. जास्तीत जास्त पदवीधरांना आपला हक्क बजावावा असं आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे. 

पदवीधरांना कोकणात आणण्याचं आव्हान !

कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पदवीधर मतदार हे नोकरी निमित्त मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणी विखूरलेले आहेत. या निवडणुकीत ना पोस्टल मतदानाची सोय, ना एव्हीएम मशीन आहे. पहिल्या पसंतीच मत इथे नोंदवायच आहे. त्यामुळे कामाधंद्यासाठी बाहेर असलेल्या पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी कोकणात आणण्याच मोठं आव्हान आहे. काही पदवीधर खास मतदानासाठी सुट्टी काढून कोकणात दाखल होणार आहेत.