'समाधान' शिबिरात जपली कोकणची संस्कृती

सरपंच भक्ती घाडींनी जिल्हाधिकाऱ्यांची 'ओटी' भरून स्वागत
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 07, 2026 20:47 PM
views 35  views

कुडाळ : राज्य शासनाच्या 'समाधान' उपक्रमांतर्गत नेरूर (ता. कुडाळ) येथे आयोजित शिबिरात केवळ प्रशासकीय कामांचा निपटाराच झाला नाही, तर कोकणच्या समृद्ध आदरातिथ्य परंपरेचेही दर्शन घडले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नेरूर गावच्या सरपंच भक्ती घाडी यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांचा कोकणी परंपरेनुसार खण-नारळाने ओटी भरून यथोचित सन्मान केला.

कोकणात आलेल्या पाहुण्यांचा मान-सन्मान करण्याची एक आगळीवेगळी पद्धत आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या जिल्ह्यात जनतेच्या हिताचे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि 'अतिथी देवो भव' या भावनेतून सरपंच भक्ती घाडी यांनी हा सांस्कृतिक वारसा जपत जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. एका महिला जिल्हाधिकाऱ्यांचा अशा प्रकारे झालेला सन्मान उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

राज्य सरकारद्वारे आखलेल्या 'समाधान' उपक्रमातून सर्वसामान्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न एकाच छताखाली मार्गी लागत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या शिबिराच्या माध्यमातून प्रशासनाला थेट जनतेच्या दारात नेल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

"जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन लोकाभिमुख होत आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव आणि स्वागत कोकणी पद्धतीने व्हावे, हाच आमचा उद्देश होता," असे भावना सरपंच भक्ती घाडी यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरामुळे केवळ कागदोपत्री कामेच झाली नाहीत, तर प्रशासन आणि नागरिक यांच्यात माणुसकीचे आणि विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाल्याचे दिसून आले.