
दोडामार्ग : आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने शनिवारी हेदूस वाघमळा शाळेत आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. वृक्षदिंडी, वारकरी दिंडी असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते, तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. विठू नामाचा गजर करत संपूर्ण सासोली-हेदुस परिसर विठ्ठलमय विद्यार्थ्यांनी केला. पावसाच्या रिमझिम सरींतला हा सोहळा पाहण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक ,पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.