
सावर्डे : सिंधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत चिपळूण तालुक्यातील लाभार्थ्यांना दुधाळ गायी-म्हशी व शेळी गट अनुदानाचे धनादेश वाटप सोहळा सावर्डे येथे उत्साहात पार पडला. आमदार शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात लाभार्थ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने पशुधन पुरवठा करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमात आमदार शेखर निकम यांनी आपल्या बालपणातील गायी-म्हशींच्या आठवणींना उजाळा देत, “शेतीला आधार देणाऱ्या पशुधनाची योग्य निगा घेतल्यास ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता येऊ शकते,” असे प्रतिपादन केले.
लाभार्थ्यांमध्ये सुधीर सावर्डेकर (असुर्डे), शरयु सावर्डेकर (रामपूर), चैतन्य मयेकर (कुटरे), संदीप राजेशिर्के (कुटरे), बाबाराम जाधव (दळवटणे), आणि शाबीरा पटाईत (कान्हे) यांचा समावेश असून त्यांना योजनेंतर्गत धनादेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ. सोनावळे (उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग), डॉ. काणसे (पशुधन विकास अधिकारी), प्रमोद केळसकर (सहाय्यक गटविकास अधिकारी, चिपळूण), डॉ. बारापत्रे, डॉ. बाळाजी डोंगरे, डॉ. पेढांबकर, डॉ. होणराव, शौकत माखजनकर, विजय भुवड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.