'एक मूठ अन्नधान्याचे दान, वाचवूया निराधारांचे प्राण'

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अभियान
Edited by: विनायक गांवस
Published on: June 26, 2025 16:34 PM
views 83  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी या नोंदणीकृत संस्थेने गरजू आणि निराधारांसाठी "द्या एक मूठ अन्नधान्याचे दान, वाचवूया निराधारांचे प्राण" हे नवीन अभियान सुरू केले आहे. संस्थेचे अध्यक्ष रवी जाधव यांनी या अभियानाबद्दल माहिती दिली असून दानशूर व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असून संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी २४ तास तत्पर असते. संस्थेच्या माध्यमातून दरमहा अनाथ आश्रमांतील मुलांना, तसेच शहर आणि गावांमधील निराधार वृद्ध आणि आजारी व्यक्तींपर्यंत पोहोचून त्यांना शक्य ती सर्व मदत केली जाते. यात जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करण्यावर विशेष भर दिला जातो. शहरांमध्ये आणि गावांमध्ये निराधार आणि गरीब लोकांची संख्या मोठी आहे. सरकारी धान्य दुकानांतून फक्त तांदूळ आणि गहू मिळत असला तरी, इतर आवश्यक किराणा सामान खरेदी करण्यासाठी या गरजू व्यक्तींकडे पुरेसे पैसे नसतात. अशा वेळी, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान त्यांना लागणाऱ्या इतर वस्तूंची पूर्तता करते. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी संस्थेला दानशूर व्यक्तींच्या मदतीची नितांत गरज आहे. 'अन्नदान - श्रेष्ठदान' या उक्तीप्रमाणे, संस्थेने सर्वांना एक मूठभर अन्नदान करण्याचे विनम्र आवाहन केले आहे. आपले थोडेसे अन्नदान अनेक निराधार लोकांचे प्राण वाचवू शकते आणि त्यांना आधार देऊ शकते.या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी आणि निराधार व गोरगरिबांचे प्राण वाचवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

अन्नदान करण्यासाठी रवी जाधव: ९४०५२६४०२७, रूपा मुद्राळे: ९४२२६३३९७१, लक्ष्मण कदम: ९४२३३०४६७४  समीरा खलील: ९८९९७१४६१४ यांना संपर्क साधावा.