सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात दिव्यांग संघटना उभी करू

अबिद नाईक यांचं आश्वासन ; साबाजी सावंत यांच्या कार्याचंही कौतुक
Edited by: लवू परब
Published on: June 22, 2025 17:34 PM
views 187  views

दोडामार्ग : दिव्यांग निराधार लोकांसाठी जी धडपड व परिश्रम साबाजी सावंत करत आहेत, ते काम म्हणजे खरे पुण्य आहे. अशा लोकांसाठी मदत कार्य करतात तेही मोठे पुण्य म्हणावे लागेल. येणाऱ्या काळात दोडामार्ग नव्हे तर आठही तालुक्यात दिव्यांग संघटना उभी करू त्यांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. दोडामार्ग सारख्या दुर्गम भागात काम करत आहात आम्ही तुमच्या पाठीशी राहू आम्ही समाजात वावरत असताना 10 टक्के राजकारण आणि 90 टक्के समाज कार्य करत असतो. संपूर्ण राष्ट्रवादी संघटना तुमच्या पाठीशी राहून तुम्हा दिव्यांग बांधवांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष अबिद नाईक यांनी केले.

साईश्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघटना कोलझर च्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. समाजात वावरत असताना सामाजिक बांधिलकी जोपासून जी लोक समाज कार्य करतात त्यांना साईश्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघटनेच्यावतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात. पुरस्काराचे हे यावर्षीचे चौथे वर्ष असून याही वर्षाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रम कोलझर येथील समाजसेवा हायस्कूलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अबिद नाईक,  प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य दिव्यांग अध्यक्ष नीता ढवण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरेश गवस, एमडी सावंत, महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रज्ञा परब, अंतरी तालुकाध्यक्ष उदय भोसले, सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई, कोलझर सरपंच सेजल गवस, पोलीस पाटील तातोबा देसाई, चंद्रकांत सावंत ऑडिटर, बांधा हायस्कूलचे मुख्याध्यापक नंदकुमार नाईक, ऍड. सोनू गवस, मुख्याध्यापक राठोड सर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष  रुपेश पावसकर, सावंतवाडी माजी उपसभापती राखी कळंगुटकर, महेंद्र देसाई, दोडामार्ग पत्रकार संघाचे अध्यक्ष रत्नदीप गवस आदी मान्यवर तसेच वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील दिव्यांग बांधव आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून करण्यात आली. 2014 मध्ये लावलेल्या रोपट्याला आज जवळ जवळ 11 वर्षे पूर्ण होत आली म्हणजेच दोडामार्ग तालुक्यात एकेकट्याला हाताशी धरून जी साईश्रद्धा दिव्यांग संघटना कोलझरचे एक दिव्यांग बांधव साबाजी सावंत यांनी तयार केली. ही संघटना तयार करत असताना त्यांनी भरपूर परिश्रम घेतले. दोडामार्ग च्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे तेरवण मेढे सारख्या भागात ही त्यांनी दिव्यांग बंधू भगिनीना एकत्र करून ही संघटना केली आहे. हळू हळू सावंतवाडी, वेंगुर्ला याही तालुक्यात दिव्यांग बांधवाना एकत्र करून संघटना करण्याचे काम ते आज करत आहेत. हे काम करत असताना त्यांना राष्ट्रवादी दिव्यांग सेल संघटनेचे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष हे पद मिळाले आहे. त्यांचे काय खरोखरचं वाखण्यजोग आहे. या पदाचे काम करत असताना त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, शेती, दशावतारी, दानशूर व्यक्ती, पत्रकार या सारख्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित केले.

या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांनी संघटनेला शुभेच्छा देत आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्र दिव्यांग सेल अध्यक्षा नीता ढवाण म्हणाल्या की दिव्यांग माता, भगिणी, बंधू यांना सरकारच्या योजना, व पेन्शन यासारख्या गोष्टी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. याही पुढे मला कधीही संपर्क करा तुमच्या मदतीला मी धावून येणार असे आश्वासन त्यांनी दिले. 

मानवता हा खरा धर्म आहे. अपंग, निराधार, गरजू लोकांना शासनाच्या योजना पोहचवणे त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत कार्य करणे,  यासारखे काम सावंत करत आहेत. त्याला माझा सलाम असेच कार्य करत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे उद्गार एम. डी. सावंत यांनी काढले.  यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन देसाई मॅडम यांनी तर आभार धारिणी देसाई यांनी मानले. आयोजित कार्यक्रम चांगल्या प्रकारे होण्यासाठी ग्रामस्थांनी मेहनत घेतली.