नशीब दुर्घटना टळली ; उभादांडा केंद्र शाळेच्या हॉलचे छप्पर कोसळले

हॉलच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाचा दुर्लक्ष
Edited by: दिपेश परब
Published on: June 21, 2025 20:04 PM
views 311  views

वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद उभादांडा केंद्रशाळा नंबर १ या शाळेचा हॉल नादुरुस्त बनला आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही या हॉलच्या दुरुस्तीकडे संबंधित विभागाकडून लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे आज या हॉलचा पुढील छपराचा भाग सायंकाळी कोसळला असून उर्वतीत भागही कोसळण्याच्या स्थितीत आहे. दरम्यान आज शनिवार असल्याने आणि शाळेत मुले नसल्याने  मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

उभादांडा केंद्रशाळा नंबर १ या शाळेमध्ये एक ते सातवी पर्यंत ७८ मुलांचा पट आहे. केंद्रशाळा असल्याने शाळेच्या याच हॉल मध्ये मुलांची प्रार्थना, पोषण आहार देणे, शाळेचे कार्यक्रम, केंद्रस्तरीय शाळांचे कार्यक्रम, निवडणुकांवेळी मतदान चालत असते. नियमित वापरात असलेली कौलारू ही हॉलची इमारत मात्र गेले दोन-तीन वर्षापासून कमकुवत बनली आहे. छपराच्या रिपी खराब झाल्या असून काही ठिकाणी कौले टिकत नसल्याने पत्रे घालण्यात आले आहेत. पावसाळ्यामध्ये दोन बाजूंनी भिंतीवरून पाणी खाली येते. छपराचा बराचसा भाग खराब झाला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीमार्फत गेली दोन वर्ष अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे या हॉलच्या दुरुस्ती संदर्भात लेखी निवेदने देऊन पाठपुरावा सुरू आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने या हॉलचा काही भाग आज कोसळला. पुढे पडणाऱ्या मुसळधार पावसा वेळी अन्य भागही कोसळण्याची भीती पालकांकडून व्यक्त होत आहे.

शाळेला लागून नवीन आठ खोल्यांची इमारत आहे. परंतु या आठ खोल्यांपैकी चार खोल्या संगणक कक्ष, विज्ञान कक्ष, व्हर्चुअल क्लासरूम आणि  मुख्याध्यापक कार्यालय यासाठी आहेत. त्यामुळे उर्वरित चार खोल्यांमध्ये सात वर्ग शिकवणे कठीण आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन नरसुले, सामाजिक कार्यकर्ते दाजी धुरी आणि सर्व पालकांकडून करण्यात आली आहे.