आमदार केसरकर आहेत कुठे ? : एकनाथ नाडकर्णी

Edited by: लवू परब
Published on: June 11, 2025 20:20 PM
views 359  views

दोडामार्ग :  हत्तींच्या उपद्रवाने कोलझर पंचक्रोशीसह दोडामार्ग तालुक्यातील स्थानिकांना जगणे मुश्किल झाले आहे. मात्र चारवेळा आमदार म्हणून निवडून दिलेल्या दीपक केसरकर यांना याचे कसलेच सोयरसुतक नाही. ते यासाठी वनअधिकाऱ्यांच्या डोक्यावर खापर फोडत आहेत. मात्र हा प्रश्न इतका गंभीर होऊनही शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला ते या भागात गेले आहेत का? आमदारकीच्या त्यांच्या १६ वर्षांच्या काळात त्यांनी या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी आज पत्रकातून केला. 

श्री. नाडकर्णी यांनी यात नमूद केले आहे की, दोडामार्ग तालुक्यात गेली 20 हून अधिक वर्ष हत्तीचा उपक्रम चढत्या क्रमाने वाढत आहे.आता याची तीव्रता वाढून कोलझर पंचक्रोशी पर्यंत त्यांचा अधिवास वाढला आहे.तेथे शेकडो कुटुंब केवळ बागायतीवर अवलंबून आहेत. हत्तींचा कळप हीच बागायती मुळापासून उखडत आहेत. हत्ती या भागात स्थिरावल्याने बागायतीबरोबरच स्थानिकांच्या जिवातालाही धोका निर्माण झाला आहे. असे असताना स्थानिक आमदार केसरकर याचे खापर कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक यांच्या नाकर्तेपणावर फोडत आहेत; मात्र हत्तींचा हा प्रश्न इतका गंभीर होऊनही त्यांनी स्वतः काय केले? याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. दोडामार्ग तालुक्यातील  स्थानिकांनी मते देऊन त्यांना चारवेळा विधानसभेत पाठवले. दोनवेळा महत्त्वाची मंत्रीपदे, पालकमंत्री पद त्यांना मिळाले. हत्तींचा प्रश्न ते आमदार झाले त्याच्या आधीपासून आहे. याचा उपद्रव केवळ केसरकर यांच्याच मतदारसंघात आहे. हत्तींनी त्यांच्या 16 वर्षांच्या आमदारकीच्या काळात केलेले नुकसान सर्वश्रुत आहे. आधी तिलारी खोऱ्यात हत्तींनी उच्छाद मांडला होता तेव्हाही त्यांनी काहीच केले आताही ते अधिकाऱ्यांच्या डोक्यावर खापर पडत आहेत. आता अधिकाऱ्यांना दोष देण्यापेक्षा हत्तींना थोपवण्यासाठी त्यांनी याआधी काय केले? हे जाहीर करावे. केसरकर यांनी आपल्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीत हत्ती उपद्रवाचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली असती तर आज ही स्थिती उद्भवलीच नसती. त्यामुळे हत्तींच्या या प्रश्नाला अधिकाऱ्यांपेक्षा स्वतः केसरकर जास्त जबाबदार आहेत.'

पत्रकात पुढे म्हटले आहे की, 'कोलझर पंचक्रोशीसह पूर्ण तालुक्यात मते मागण्यासाठी होणाऱ्या सभांमध्ये केसरकर प्रत्येकवेळी येथील शेती, बागायतीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देतात. प्रत्येकवेळी स्थानिक या भूलथापांना बळी पडून त्यांना मतदान करतात. आता मात्र त्यांनी स्थानिक मतदारांच्या विश्वासघाताची परिसीमा गाठली आहे. कोलझर पंचक्रोशीत गेले दोन महिने हत्ती उपद्रवाने परिसीमा गाठूनही स्थानिकांचे अश्रू पुसायला ते तेथे पोहचलेले नाहीत. या प्रश्नावर त्यांनी या काळात एक शब्दही उच्चारला नव्हता. तिलारी खोऱ्यातील स्थानिकांनीही त्यांच्या या असंवेदनशीलतेचा अनुभव याआधी घेतला आहे.दोन दिवसापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांवर खापर फोडल्याचे वक्तव्य याला अपवाद म्हणता येईल. याआधी खनिजविषयी झालेल्या विविध शासकिय प्रक्रियांमध्ये, जनसुनावण्यांवेळी सक्रिय असणारे केसरकर आता स्थानिकांच्या गळ्यापर्यत संकट आले असताना गप्प का?, त्यांचा प्रशासनावर वचक राहिला नाही का?, त्यांना स्थानिक बागायतदारांना वाऱ्यावरच सोडायचे आहे का? या प्रश्नाची उत्तरे द्यावीत, असे आवाहनही श्री. नाडकर्णी यांनी पत्रकातून दिले आहे.