
दोडामार्ग : कोनाळकट्टा येथील महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बेकायदेशीररित्या सामाईक जमिनीत विदयुत पोल उभे केले आहेत. शिवाय त्याचा मोबदलाही जमीन मालकांना दिला नाही. आम्हा जमीन मालकांना याबाबतीत न्याय मिळवून द्यावा. कंपनीच्या या बेकायदेशीर कारभाराविरोधात शुक्रवार दिनांक १३ जून रोजी कंपनीच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसमवेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा दयानंद रामा नाईक यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री रितेश राणे यांना दिला आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, खानयाळे येथे सर्वे नंबर ८८/१ व ८५/१ आमच्या मालकीची सामाईक जमीन आहे. याठिकाणी महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कालव्याच्या पाण्यावर विद्युत निर्मितीचे काम करते. निर्मीती केलेला विद्युत प्रवाह पुढे जाण्यासाठी या कंपनीने आमची परवानगी न घेता आमच्या जमिनीत उच्च दाबाचे पोल उभे केले आहे. हे पोल उभे करत असताना आम्हाला नोटीस सुध्दा दिलेली नाही. त्यामुळे हे पोल उभे केल्याने आमची जमीन वाया गेली असून त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. या जमिनीत आम्ही शेतीदेखील करू शकत नाही. शेती करता येत नसल्याने माझे व माझ्या कुटुंबाचे लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. आपण आम्हाला योग्य तो न्याय मिळवुन दयावा, अन्यथा न्यायहक्कासाठी १३ जून रोजी रोजी कंपनीच्या कोनाळकट्टा येथील कार्यालयासमोर मी माझ्या कुटुंबासमेवत तसेच परिसरातील शेतकऱ्यांसोबत उपोषण करणार असल्याचे दयानंद नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.