
कणकवली : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात दहावी, बारावी हे वर्ष महत्त्वाचे असते. असलदे गावातील शैक्षणिक वाटचालीत दहावी, बारावी मध्ये विद्यार्थ्यांना मिळालेले यश कौतुकास्पद आहे. असलदे गावाला अभिमान वाटेल असे यश या दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. नांदगाव व कोळोशी हायस्कुल मध्ये पहिल्या क्रमांकाचे यश मिळवण्याचे काम मंदार शामसुंदर हडकर ( 91.80 नांदगाव हायस्कुल ), तेजस्विनी सुनील तांबे ( 79.80 कोळोशी हायस्कुल ) या विद्यार्थ्यांनी केला आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिवशी झालेल्या सन्मानाने प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे अहिल्याबाई होळकर यांचे विचार आणि कार्य आत्मसात करत पुढील जीवनात यशाचे सातत्य राखावे , असे आवाहन कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी केले.
असलदे ग्रामपंचायत, रामेश्वर विविध कार्यकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंती दिनाचे औचित्त साधून दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करत पुष्पहार अर्पण करत दीपप्रज्वलन सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, उपसरपंच सचिन परब, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, माजी चेअरमन प्रकाश परब , ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे, विद्या आचरेकर , विद्या डामरे , सुवर्णा दळवी, सपना डामरे, ग्रामसेवक संजय तांबे, सचिव अजय गोसावी, संतोष परब, सुनील तांबे , विनायक मिठबांवकर, ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब, प्रकाश वाळके, सत्यवान घाडी, प्रतिक्षा परब आदींसह आरोग्य कर्मचारी , ग्रामस्थ , पालक, विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.
भगवान लोके म्हणाले, विद्यार्थ्यांना पुढील काळात उच्चशिक्षणासाठी सोसायटीच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करुन देऊ. आर्थिक अडचणीमुळे आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही याची काळजी आम्ही घेवू. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना व्यावसायिकदृष्ट्या अभ्यासक्रम निवडावेत. ग्रामपंचायत आणि सोसायटी गावातील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल.
सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले, गावातील 10 वी 12 वी तील विद्यार्थांनी चांगले यश मिळवले आहे. त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. या विद्यार्थ्यांनी पुढील काळात गावाचे नाव लौकीक वाढवावे.
या सत्कार सोहळ्यात सरस्वती हायस्कुल नांदगाव मध्ये प्रथम आल्याबद्दल मंदार शामसुंदर हडकर, कोळोशी हायस्कुल मध्ये प्रथम तेजस्विनी सुनील तांबे, द्वितीय वैष्णवी सतिश पांचाळ यांना शाल , पुष्पगुच्छ, भेटवस्तु देवून सरपंच चंद्रकांत डामरे, चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले, तसेच अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त आशासेविका भाग्यश्री नरे, अर्चना परब यांचा ग्रामपंचायतच्यावतीने शाल ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या कार्यंक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक संजय तांबे तर आभार उपसरपंच सचिन परब यांनी मानले.