
मालवण : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज वीज वितरण कार्यालयात धडक देत उपकार्यकारी अभियंता सचिन म्हेत्रे यांना घेराव घालून जाब विचारला. वीज पुरवठा सुरळीत करणे आणि तीन दिवस वीज पुरवठा खंडीत झाल्याबद्दल ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याच्या विषयावर आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर उपकार्यकारी अभियंता यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून नुकसान भरपाई संदर्भात असलेल्या शासन निर्णयाची माहिती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. तसेच दिवसभरात वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन यावेळी श्री. म्हेत्रे यांनी दिले. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी आवश्यक असणारी मशिनरी आणि साहित्य तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे तसेच नुकसान भरपाईसंदर्भात वीज वितरण कार्यालयातून अधिकृतपणे ग्राहकांना माहिती देण्यात यावी. यासंदर्भात वीज वितरणकडून कोणतीही हयगय करण्यात आल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला आहे.
गेले तीन दिवस मालवणात सुरू असलेल्या वीजेच्या खेळखंडोबाबद्दल ठाकरे शिवसेनेच्यावतीने आज सकाळी वीज वितरण कार्यालयावर धडक देण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक नितीन वाळके, महेंद्र म्हाडगुत, युवा सेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, महिला आघाडी पदाधिकारी पुनम चव्हाण, दिपा शिंदे, निनाक्षी शिंदे मेथर, भाग्यश्री लाकडे खान, नरेश हुले, चिंतामणी मयेकर, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, प्रसाद चव्हाण, किशोर गावकर, बंड्या सरमळकर, गणेश चव्हाण, कुणाल साळुंखे, दत्ता पोईपकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्यटन व्यावसायिक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान फक्त वीज वितरणमुळे झाले आहे, यामुळे संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली. यावेळी बीज वितरणसंदर्भात असलेल्या शासन निर्णयानुसार देण्यात येणारी नुकसान भरपाई याबाबत माहिती देण्यात आली. यासाठी ग्राहक कक्ष असणे आवश्यक असल्यास सदराचा ग्राहक कक्ष तातडीने वीज वितरण कार्यालयात सुरू करण्यात यावा अशी सूचना यावेळी करण्यात आली. तसेच येणाऱ्या ग्राहकाचा नुकसान भरपाईचा अर्ज भरण्यात यावा, अशीही सूचना यावेळी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. दरम्यान, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी वीज वितरणच्या ग्राहकांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शिवसेना तालुका कार्यालयात यंत्रणा उभारण्यात येणार असून अर्ज भरून देण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.
वीज वितरण कंपनीने घेतलेल्या ग्राहकांच्या बैठकीत मालवण केंद्रापर्यंत येणाऱ्या कुडाळ, विरण आणि आचरा या लाईनवरील सर्व झाडे तोडण्यात आलेली असून वीज पुरवठा खंडीत होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आलेले होते. आणि आता लाईनवर झाडे पडल्याने वीज पुरवठा खंडीत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे, म्हणजे वीज वीतरणकडून चुकीची माहिती देण्यात येत असल्याने ग्राहकांचे नुकसान होत आहे. यामुळे आता तिन्ही लाईन बंद असल्याने ग्राहकांना पाणी विकत घेण्याची वेळ आल्याचेही यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.