
दोडामार्ग : गेले चार दिवस सुरु असलेल्या धुवांधार पावसाने तळकट- कोलझर रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले आहे. उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य व आता पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य यामुळे कोलझर पंचक्रोशीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या आरोप दिव्यांग संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष साबाजी सावंत यांनी केला आहे. तात्काळ रस्त्यावरील चिखल बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा अन्यथा चिखलातच बसून आंदोलन करण्यात येणार असल्याचे सावंत म्हणाले.
याविषयी कोकणसाद LIVE शी बोलताना सावंत म्हणाले की, प्राधानमंत्री ग्रामसडक योजने तून पडवे माजगाव तळकट, कोलझर असा रस्ता मंजूर झाला गेल्या 3 महिन्यापासुन संबंधित ठेकेदार आपला मनमानी कारभार करून धिम्या गतीने काम करत आहेत. काम करत असताना रस्त्यावर धुळीचे साम्राज्य झाले होते. नागरिकांच्या घरात धूळ जाऊन घरगुती वस्तू तसेच आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागल्या होत्या. वारंवार रस्त्यावरील धुळीवर पाणी मारण्यास सांगितले असताना ठेकेदार मनमानी करत होता. सुरु झालेल्या अवकाळी पावसाने गेल्या चार दिवसात या रस्त्यावर चिखल चिखल चोहीकडे चिखल झाला आहे. वाहन चालक यांना प्रवास करताना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत आहे. हा सर्व प्रकार ठेकारदाराच्या मनमानी कारभारामुळे झाला आहे. याला सर्वस्वी ठेकेदारच जबाबदार असल्याचे सावंत म्हणाले.
धो धो पावसातही काम सुरु
धिम्या गतीने सुरु असलेले तळकट कोलझर रस्त्याचे काम ठेकेदार धो धो पावसातही करत आहे. गटारात रस्त्यावर पाणी चिखल असताना त्याच परिस्थितीत गटाराचे कॉंक्रिटीकरण केले जात आहे. या कामाचीही चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पाणी व चिखलामध्ये सिमेंट ओतून बोगस काम केले जात आहे. यात संबंधित खात्याचे अधिकारीही मिलिभगत असल्याने हे बोगस काम सुरु असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे.