
दोडामार्ग : जुन्या मित्रांच्या आठवणीच्या हिंदोळ्यावर आठवणीच्या क्षणांनी हे दिवस आता भरावे खंत ना कुठली ह्या मनाशी आता उरावे राहिल शेवटची इच्छा या मित्रांसोबत
पुन्हा एकदा आयुष्य नक्की लाभावे. आयुष्याच्या वर्गात शिक्षणाची शाळा ज्यावेळी भरते, त्यावेळचा मित्र मैत्रिणींचा सहवास, आणि शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात दडलेल्या आठवणी, हे आपल्या आनंदी जगण्याचे रसायन असते. विद्येबरोबरच आठवणी आणि संस्कारांचे दप्तर घेऊन, आपण बाहेर पडतो, प्रत्येक सवंगडी आपापल्या मार्गांनी मार्गस्थ होतात. 25 वर्षांचा काळ लोटतो, आणि अचानक याच मित्र-मैत्रिणींची पुन्हा एकदा शाळा भरते. तो क्षण किती रम्य आणि सुवर्ण अक्षरांनी रेखाटण्याचा असेल. होय, न्यू इंग्लिश स्कूल भेडशीच्या 1999 -2000 ची दहावीची बॅच तब्बल 25 वर्षांनी एकत्र आली, आणि बालपणातील आठवणींच्या हिंदोळ्यावर प्रत्येक विद्यार्थी झुलत गेला. निमित्त मात्र होते मित्र-मैत्रिणींच्या गेट-टुगेदरचे!
चंदू रॉयल प्लाम फार्म दोडामार्ग येथे हा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. प्रत्येक जण समोरासमोर आल्यानंतर हृदयातील आठवणींची कवाडे खुली झाली. त्या रम्य आठवणींचे अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यात तरळत होते. यावेळी आयोजित केलेले विविध उपक्रम पुन्हा एकदा त्या आठवणींच्या दप्तरात बंदिस्त झाले. संगीत खुर्ची, लिंबू चमचा, फुगे घेऊन चालणे, सर्वात जलद स्ट्रॉं केसामध्ये माळणे यांसह सर्व बॅचने एकत्र केक कापणे याचा साऱ्या बॅचमेंट नी पुरेपूर आनंद लुटला. तत्पूर्वी याच बॅचमधील सैन्य दलात सेवा बजावून सेवा निवृत्त झालेले माजी सैनिक मित्र अजित महादेव नाईक व विजय वसंत गवस यांचा सत्कार करताना सवंगड्यांचा उर अभिमानाने भरून आला. खानयाळे येथील नारायण नाईक याने या स्नेह मेळव्यात सादर केलेली अप्रतिम गीत, ज्योत्सना धरणे हिने शाळेतील त्यावेळची काही एकवलेली गाणी, प्रवीण नाईक याने नटसम्राट नाटकातील आप्पासाहेब बेलवलकर यांची सादरीकरण केलेली भूमिका यादगार ठरली. धीर गंभीर बनलेल्या वातावरणाला त्यानंतर रामू खरवत याने स्वतःच्या वेगळ्या विनोदी शैलीत सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटविले. महादेव डांगी याने प्रत्येकाच्या शालेय जीवनातील क्षण पुन्हा पुनर्जीवित केले. तर संदीप बुवासाहेब देसाई याने वेळोवेळी गायलेली शायरी, कवी सतीश धर्णे व राजाराम भट यांनी स्नेह भेट दिलेल्या कविता आणि निलेश दळवी याने सर्व मित्रांना दिलेले आपुलकीच गिफ्ट सारच काही भारावणार होतं. यावेळी शरीर जरी वर्तमानात असले, तरी मन मात्र शालेय जीवनात रमले होते. प्रत्येक जण प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करत होता. संदीप बुवासाहेब देसाई, सतीश धरणे यांच्यासह बऱ्याच सहकाऱ्यांनी हा तब्ब्ल २५ वर्षांनी दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा घडवून आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वांनीचं संदीप, सतीश, अजित व सहकारी मित्रांचं विशेष कौतुक केलं.
संदीप बु. देसाई, सतीश धर्णे, संदीप अ. देसाई, अजित देसाई, नारायण दळवी, प्रवीण नाईक, अजित गवस, मनोज पवार, बाळा सावंत, बाळा ठाकूर, रेश्मा देसाई, आरती बोंद्रे, गंगा धर्णे, सुवर्णा पारधी, तुकाराम नाईक, रजनीश गवस, विजय गवस, नारायण नाईक, दिपा धर्णे, मनोज बोंद्रे, दिलिप दळवी, राजाराम भट, सचिन गवस, अजित नाईक, महेश सुतार, ज्योती नाईक, सुरेखा नाईक, प्रशांत कदम, प्रतिभा सावंत, रामचंद्र खरवत, संतोष तांबे, मीना धुरी, सुमन दळवी, मेघा दळवी, कविता परब, निलेश वझरेकर, ज्योत्स्ना धर्णे, समीर वझरेकर, महादेव डांगी हे सारे संवगडी या आनंद मेळाव्याचे साक्षीदार झाले. पुन्हा एकदा २०२६ च्या गेट टू गेदर चा संकल्प सोडून साऱ्या वर्गमित्र मैत्रिणींनी एकमेकांना अलविदा केलं.
मित्र संदीपची "सुदीप" मैत्री....
25 वर्षानंतर दहावीची बॅच एकत्र आली, आणि या प्रदीर्घ प्रवासात यशाची उत्तुंग शिखरे गाठलेल्या सवंगडी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यात एक असा विशेष सन्मान करण्यात आला तो संदीप अमृत देसाई यांचा. एक ग्रामीण वार्ताहर, प्रतिनिधी ते एका वृत्तपत्राचा संपादक असा त्यांनी प्रेरणादायी प्रवास यशस्वी केला. कठोर परिश्र, जिद्द, आकांक्षा आणि उत्तुंग ध्येय उराशी बाळगून मिळवलेल्या या यशाबद्दल, मित्र-मैत्रिणींनी संदीप देसाई याचा सत्कार या कार्यक्रमात घडवून आणला. प्रत्येक कार्यक्रमात किंवा सुखदुःखाचा वेळी नेहमी संदीप सोबत असतो, असे गौरव उद्गार यावेळी विद्यार्थ्यांनी काढले. आपले शालेय जीवनातील मित्र जेव्हा मित्राचा सन्मान करतात, तो क्षण आयुष्यातील अत्युच्च क्षण असतो, अशी प्रतिक्रिया या सन्मानाला संदीप देसाई यांनी देत सर्व मित्रांची मने जिंकली.