
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे गावातील चव्हाटावाडी ते राळकरवाडी या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामस्थ पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. यापूर्वी प्रजासत्ताक दिनी, २६ जानेवारी रोजी गावातील रहिवासी आत्माराम नारायण साटेलकर आणि ४० ग्रामस्थांनी याच मागणीसाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मुख्यालय ओरोस येथे उपोषण केले होते.
याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, उपोषणानंतर दीड महिना पाठपुरावा करूनही रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. सरकारी कर्मचारी केवळ पत्रव्यवहार करत असून या निष्क्रियतेमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनापासून सावंतवाडी तहसील कार्यालयासमोर पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी ओरोस यांना निवेदन पाठवले आहे.
निवेदनात त्यांनी उपोषणाला बसण्यापूर्वी १५ ते २० दिवसांच्या आत रस्ता खुला करून, आवश्यक भराव टाकून पक्का रस्ता करण्याची मागणी केली आहे. निवेदनासोबत मागील उपोषणाचे पत्र आणि ग्रामपंचायत धाकोरे तसेच संबंधित शासकीय कार्यालयांशी केलेला पत्रव्यवहार जोडण्यात आला आहे. आता जिल्हा प्रशासन या गंभीर विषयावर तातडीने काय भूमिका घेते आणि ग्रामस्थांना दिलासा मिळतो का असा सवाल सामाजिक कार्यकर्ते आत्माराम साटेलकर यांनी उपस्थित केला आहे.