वसई - सावंतवाडी पॅसेंजर सुरू करण्याची मागणी

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने घेतली आम.राजन नाईकांची भेट
Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2025 18:28 PM
views 190  views

सिंधुदुर्ग : वसई विरार परिसरामध्ये ६०% लोकवस्ती ही कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड येथील रहिवाशांची आहे,पश्चिम रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गावर नेहमीसाठी रेल्वे सुरू करावी अशी प्रवासी संघटनेची मागील १० वर्षापासूनची मागणी आहे,वसई विरारकरांना कोकणात जाणारी रेल्वे पकडण्यासाठी गर्दीतून दादर,CSMT किंवा कुर्ला येथे जावे लागते.शिवाय वसई रोड वरून कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे सुपरफास्ट असल्याने त्याचा कोकणवासियांना काहीच फायदा होत नाही.

पश्चिम रेल्वे वरून कोकणासाठी, नेहमी धावणारी,रातराणी व स्लो रेल्वेची मागणी असताना रेल्वे प्रशासनाने १०११५/१६ ही वांद्रे मडगाव साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस दिली ती कोकणातील तब्बल ३४ स्टेशनवर न थांबणारी गोव्यासाठी रेल्वे आहे.प्रवासी संघटना पॅसेंजर मागतेय तर सुपरफास्ट एक्सप्रेस मिळतेय,आम्ही नेहमीसाठी मागतोय तर साप्ताहिक मिळतेय,आम्ही रात्रीसाठी रेल्वे मागतोय तर दिवसाची मिळतेय,आम्ही कोकणासाठी मागतोय तर ती गोव्यासाठी मिळतेय तर आम्ही स्लो मागतोय तर सुपरफास्ट मिळतेय,त्यामुळे ही रेल्वे बंद करून वसई सावंतवाडी पॅसेंजर मिळावी अशी प्रवासी संघटनेने स्थानिक आमदारांकडे मागणी केलेली आहे.

तसेच वसई विरार परिसरामध्ये रिक्षात ४ प्रवासी व शेरीग रिक्षाभाडे डबल २० रू. घेऊन सामान्य प्रवाशांची भयंकर आर्थिक लुटमार केली जातेय, १२ ते १५ हजारावर काम करणाऱ्या प्रवाशांनी रोज रिक्षासाठी ४० रू.आणायचे कोठून? यासाठी लवकरच RTO, प्रवासी संघटना व आमदार यांची संयुक्त मिटींग घेण्यासाठी विनंती करण्यात आली.

 वसई विरार महानगर पालिकेकडे प्रवाशांच्या तुलनेत मनपाच्या बसेस नाहीत,मनपा परिसरातील अनेक प्रभागात पिण्याचे पाणीच मिळत नाही,वाढलेली टॅंकर लॉबी,सुसज्ज मनपाचे हॉस्पीटल,वसई रोड टर्मिनस,नायगाव न्यूचंद्र येथील पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणाऱ्या फाटकाचे रखडलेले काम,अरुंद रस्ते,ट्राफीक जाम अशां अनेक समस्यांसाठी मनपाच्या आयुक्तांसोबत संयुक्त मिटींग घेण्यासाठी आमदारांना प्रवासी संघटनेच्या वतीने विनंती करण्यात आली.

यावेळी प्रवासी संघटना अध्यक्ष अनिल मोरे, उपाध्यक्ष बाळ वेळकर, प्रभाकर चिबडे, सेक्रेटरी यशवंत जडयार, सहसेक्रेटरी सुदेश तावडे, खजिनदार शेखर बागवे, कार्यकारणी सदस्य प्रभाकर डिचोलकर उपस्थित होते.