
सावंतवाडी : ओटवणे गावचा सुपुत्र सर्जनशील युवा कलाकार रोहित सुरेश वरेकर यांने कला क्षेत्रात मोठी झेप घेतली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. पारंपरिक कोकणी जीवनशैलीसह संस्कृती, आणि समाजातील बदल आपल्या कलेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणाऱ्या रोहितला अवघ्या महिनाभरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे पाच पुरस्कार आणि फेलोशिप प्राप्त झाल्या आहेत. या कलेतील रोहितच्या उत्तुंग यशामुळे कोकणच्या अर्थात सिंधुदुर्गच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
रोहीत वरेकरने आजपर्यंत साकारलेल्या विविध कलाकृतीत पारंपरिक कोकणी परंपरा, संस्कृती, आणि समाजातील बदलांचे प्रतिबिंब दिसून येते. त्याच्या कलेतुन ग्रामीण कोंकणातील लुप्त होत चाललेल्या परंपरा सांस्कृतिक स्मृति आणि नागरीकरणामुळे होणारे बदल प्रभाविपणे पहायला मिळतात. रोहितचा कलात्मक दृष्टीकोन कोकणातील पारंपरिक मुळांमध्ये दडलेलाआहे. लाकडाच्या खेळण्यांची परंपरा, मातीची घरे, आणि ग्रामीण जीवनशैलीतील साधेपणाचा प्रभाव त्यांच्या कलेतून स्पष्टपणे जाणवतो. तो जुन्या स्मृतींना जिवंत ठेवत काळाबरोबर हरवलेल्या परंपरांचे पुनरुज्जीवन करतात. त्यांची कला ही कालबाह्य होत चाललेल्या गोष्टींना एक नवा अर्थ देण्याचा प्रयत्न आहे. रोहित आपल्या कलेत पारंपरिक नैसर्गिक संसाधनांपासून गळून पडणाऱ्या मातीच्या घरांपासून ते लाकडी खेळण्यांपर्यंत आणि पर्यावरणपूरक कलाकृती, कोकणातील संस्कृती, परंपरा नव्याने उभ्या करताना सध्या होणारे नागरीकरणाचे परिणाम त्याच ताकदीने मांडतो. त्यामुळे त्याची कला ही फक्त रंगरेषांपुरती मर्यादित नाही, तर ती समाजाच्या अंतःकरणाशी संवाद साधते.