सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगांव, माजगांव, चराठा, कोलगांव तसेच सावंतवाडी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात माकडांपासून उपद्रव चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नारळ, केळी, शेती पिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर या माकडांचा तसेच अन्य वन्य प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या नेतृत्वात उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
फळबागायती तसेच भातशेती व इतर पिकांचेही गवारेडे व अन्य वन्य प्राण्यांपासुनही नुकसान होत आहे. याबाबतीत शासन स्तरावर शेतकऱ्यांना योग्य आर्थिक नुकसान भरपाई मिळत नाही. ही वस्तुस्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होत आहे. याचा गांभिर्याने विचार करुन तालुक्यातील गावांमध्ये होणाऱ्या माकडांच्या व वन्य प्राण्यांच्या उपद्रवाचा योग्य तो बंदोबस्त करण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशाप्रकारचे लेखी निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.
यावेळी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष गजानन नाटेकर, शहर शिवसेना प्रमुख खेमराज ऊर्फ बाबु कुडतरकर, संजय माजगांवकर, बापु कोठावळे, राजन परब, संजय गावडे, एकनाथ हळदणकर आदी उपस्थित होते.