मालवण : श्री देव रवळनाथ पंचायतन आंबडोस मधील सर्व देव देवता तरंग, पालखी सहित व गावातील सर्व लोकासहित ढोल ताशांच्या गजरात सोमवारी मालवण समुद्र किनारी येथे प्रसिद्ध असलेल्या मोरयाचा धोंडा या ठिकाणी जात तीर्थ स्नानाचा योग साधला आहे. या निमित्त पूर्ण आंबडोस गाव मोरयाचा धोंडा समुद्रकिनारी लोटला होता. गावातील शेकडो रयतेने समुद्रात तिर्थस्नान केले.
मालवण तालुक्यातील आंबडोस गावची ग्राम देवता श्री देव रवळनाथ पंचायतन सोमवती निमित्त आज तीर्थ स्नानासाठी मालवण मोरयाचा धोंडा येथे गेली होती. सोमवती अमावस्या असल्याने आज तीर्थ स्नानाचा योग होता. त्यामुळे सकाळी ८.३० वाजता श्री देव रवळनाथ पंचायतन आंबडोस मधील सर्व देव देवता तरंग, पालखी सहित व गावातील सर्व लोकासहित मालवण समुद्र किनारी पायी निघाली होती. आंबडोस रवळनाथ मंदिर येथून सकाळी प्रस्थान केल्यानंतर नजीकच्या नांदरूख गावची ग्राम देवता श्री देव गिरोबा देवाची पहिली भेट घेतली. यानंतर कातवड, आनंदव्हाळ, कुंभारमाठ मार्गे देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिर येथे या देवाचा लवाजमा पोहोचला.
या ठिकाणी गेल्यावर परंपरेने विश्रांती घेतली. या ठिकाणी तेथील व्यक्तींनी देवा समवेत आलेल्या भाविकांसाठी मोफत नाष्टा , चहा याची व्यवस्था केली होती. येथील विश्रांतीचा अवधी संपल्यानंतर तीर्थ स्नानासाठी देवाची असलेली पारंपारिक वाट म्हणजेच गाड पाणंद येथून देव मोरयाचा धोंडा येथे जाण्यास निघाला. वायारी गावकरवाडी, दांडी मार्गे मोरयाच्या धोंडा येथे तिर्थ स्नानासाठी देव पोहोचले. यावेळी देवाच्या स्वागतासाठी वायरी गावकरवाडा येथील रहिवाशी भाविकांनी आपल्या घराच्या गेट समोर आकर्षक रांगोळी काढली होती. काही ठिकाणी रस्ता पाण्याने धुवून त्यावर सुस्वागतम असे लिहिले होते.
मोरयाचा धोंडा येथे पोहोचल्यावर गणेशपूजन करून प्रथम देवाने पंचायतन सह तीर्थ स्नान केले. त्यानंतर भाविक यांनी ग्रामस्थ स्नान केले. येथे आलेल्या नागरिकांसाठी माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, चंदन गांवकर यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. येथील सर्व विधी आटोपल्यावर आपल्या समस्या घेवून आलेल्या भाविकांची गाऱ्हाणी देवाच्या कानी घालण्यात आली. त्यानंतर दुपारी अडिज वाजता देव आलेल्या पुन्हा देऊळवाडा येथील नारायण मंदिर येथे पोहोचले. त्यानंतर श्री देव नारायण याला नैवैद्य दाखवून प्रसादाचा कार्यक्रम झाला. येथे आलेल्या आंबडोस मधील भाविक नागरिकांसाठी मोफत बुफे पद्धतीने भोजनाची व्यवस्था केली होती. माजी नगरसेवक दीपक पाटकर, रवींद्र मालवणकर यांनी स्वतः तेथे राहून भाविकांना सेवा दिली. यावेळी मंदिराचे मानकरी हरीश गावकर, अक्षय गावकर यांचेही सहकार्य लाभले.
तसेच महेश बांदेकर यांनी आपल्या घरी आलेल्या भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था केली होती. त्याच प्रमाणे माजी नगरसेविका निना मुंबरकर, सौगंधराज बांदेकर यांनीही आलेल्या भाविकांना आपल्या हॉटेल मध्ये मोफत भोजन दिले. श्री देव नारायण मंदिरातील विश्रांतीची वेळ संपल्यानंतर आलेल्या मार्गाने परत आंबडोस रवळनाथ मंदिर मुक्कामी श्री देव रवळनाथ पंचायतन निघाले. या तीर्थस्नाना वेळी सहकार्य करणाऱ्या मालवण मधील समाजसेवी भाविक व्यक्तींचे आंबडोस मानकरी वर्ग, ग्रामस्थ, रवळनाथ मदिर पंचायतन यांच्यावतीने आभार व्यक्त केले आहेत.