
सावंतवाडी : काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्थेतर्फे दरवर्षी दिव्यांग मेळाव्याचे आयोजन केले जाते. हे बारावे वर्ष असून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सावंतवाडीचा सन्मान त्यांनी केला. या संस्थेचे संस्थापक चंद्रकांत दळवी आहेत.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी यांनी दिव्यांग बांधवांसाठी शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनेंबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, निमंत्रण देऊन सुद्धा आमच्या कुठच्याही कार्यक्रमाला शासनाचा एकही अधिकारी उपस्थित राहत नाही. प्रशासनाचे अधिकारी आमच्या दिव्यांग बांधवांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत तर आमच्या व्यथा व आमचे हक्क अधिकार त्यांना कधी समजणार ? अशा शब्दांत शासनाबद्दल त्यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. माझ्या दिव्यांग बांधवांना न्याय हक्क मिळण्यासाठी मी सतत धडपड राहणार असं ते म्हणाले. धुरी यांना स्वतःच्या पायावर आधाराविना चालता येत नाही. तरीही मोठी अपंग सेवा संस्था ते चालवत आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी संस्थेला बळकटी देण्यासाठी खूप मेहनत घेतली असून दरवर्षी अशाच प्रमाणे दिव्यांग मेळावा घेतला जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी युवा फोरम भारत संघटना संस्थापक अध्यक्ष ऍड. यशवर्धन राणे यांनी धुरी यांना आश्वासन दिले की यापुढे तुमच्या कुठच्याही कार्यक्रमाला तुम्ही सांगाल तो शासनाचा अधिकारी तुमच्या कार्यक्रमाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी राहील. तर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर यांनी आपण नेहमी तुमच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान म्हणजेच "अजून माणुसकी जिवंत आहे" हे मनात ध्येय बाळगून माणुसकी जिवंत घेण्यासाठी निरंतर सेवाभावी कार्य करत राहू असं मत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित दिव्यांग बांधव व ग्रामस्थांच्या जेवणाची व्यवस्था सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून करण्यात आली. तर ग्रामपंचायत पेंडूर यांच्यामार्फत दिव्यांग बांधवांना भेटवस्तू म्हणून 200 घड्याळ देण्यात आली. याकार्यक्रमाप्रसंगी चंद्रकांत दळवी,विनोद धुरी, सतीश बागवे, शैलेश नाईक, संजय पेडणेकर, रवी जाधव, समीरा खलील, प्रसाद कोदे, शाम हळदणकर, हेलन निबरे, सुरेश बिर्जे,एडवोकेट यशवर्धन राणे, सौ राधिका पेंडूरकर, अनिल शिंगाडे, उर्मिला चव्हाण, अनिल पाटील उपस्थित होते.