
गोवा : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी राजभाषा कायद्यात मराठी नकोच,त्याची दुरूस्ती करा असा प्रस्ताव मांडणारी एका वृत्तपत्रातील बातमीही अधिकृत व खरी आहे की नाही असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला याचे पहिले कारण म्हणजे भाईंना आपण सगळे एक दिलदार,सहृदयी,सच्चा सर्जनशील लेखक म्हणून आज इतकी वर्षे ओळखतो. त्यांना मिळालेल्या 'ज्ञानपीठा'चा आनंद आपण सगळ्यांनीच मनापासून जल्लोष करत साजरा केला होता. कोकणी लेखकांइतकेच ते अनेक मराठी साहित्यिकांनाही जवळचे व आदरणीय आहेत. त्यांचे लेखनही लोकप्रिय आहे, ते एक 'वाचले गेलेले' लेखक आहेत हे महत्वाचे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अतिथी म्हणून त्यांना सन्मानाने बोलावले गेले होते. तिथले त्यांचे भाषण व मराठीविषयक विचार हेही आपल्या स्मरणात आहेतच. अनेक कोकणी साहित्यिकांप्रमाणेच खुद्द भाईंच्याही लेखनजाणिवांच्या मुळावर मराठीने खतपाणी घातलेले आहे आणि असे असताना आज त्याच भाईंनी मराठी कोकणी भाषिक वाद अकारणच पुन्हा उकरून काढला हे फार विस्मयचकित करणारे आहे. परवा एका आमदाराने मराठीविषयक असे अनुद्गार काढून माफी मागून वातावरण निवळतेय तोवर साक्षात आपल्या भाईंसारख्या दर्जेदार व ज्येष्ठ लेखकाने मराठीला पुन्हा खरवडले! सातत्याने अशा कुरापती काढण्यामागची कारणे विविध प्रकारची असली तरी पुन्हा पुन्हा इथे मायमराठीवर घाव घालण्याचा प्रयत्न होतो आहे ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. या मनोवृत्तीचं खरोखरच सखेद आश्चर्य वाटतं, असं मत डाॅ. अनुजा जोशी यांनी मांडलं.
आज इतकी वर्षं गोव्यात कोंकणी राजभाषा आहे. मराठी सहभाषा आहे. सर्व प्रकारची बळजोरी सहन करूनही मराठी कोणताही आक्रस्ताळेपणा न करता नांदली,नांदते आहे. अरेरावी न केल्यामुळे तीचं महत्त्व तीळभरही कमी झालं नाही.शाळा- महाविद्यालयात गुणांच्या आमीषालाही बळी न पडता मुलं मराठीच घेणं पसंत करतात. आपली काठी मोठी ठरावी म्हणून समोरची काठी मोडणे कितपत योग्य आहे? कोंकणी मराठी ओठा-पोटाच्या भाषा म्हणून गोव्यात नांदत असताना आज हे काय नवीनच....एका भाषेतील प्रतिथयश साहित्यिक दुस-या भाषेविषयी असा विचार कसा काय करू शकतात? अशा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा सोशल मिडियावर तर काल पाऊस पडला. सर्जनशील मनांचा इतका प्रचंड असंतोष व रोष ओढवून घेऊन भाई कोकणी भाषेला कोणती समृद्धी मिळवून देऊ पाहताहेत? आज सातत्याने युद्धाच्या उंबरठ्यावर उभं असलेलं जग हा आपल्या चिंतेचा विषय बनलेला असताना, मत्सर ही मानवी स्वभावाची विखारी कीड माणुसकीला पोखरत निघालेली असताना एखाद्या लेखकाने समन्वयाचा,शांतीचा विधायक मार्ग दाखवायचा की तेढ वाढवायची ? अनिष्ट वृत्ती-प्रवृत्तींवर प्रहार करायचे की त्या फोफावणा-या आगीवर फुंकर घालत रहायची ?
भाई, तुम्ही सुद्धा ......??!!!असे विचारण्याची वेळ आमच्यावर यावी हा खरोखरच एक दैवदुर्विलास आहे. एका ज्ञानपीठाने हा असा विचार द्यावा ? कशासाठी हा विखार? काय साध्य होणार यामुळे?तेढ कमी व्हावी असे प्रयत्न तुम्हासारख्या ज्येष्ठांनी करायचे तर हे उलटच !! आमच्या मनात तुमचे एक वेगळे, आदरणीय स्थान होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने सन्मानाने अतिथी म्हणून बोलावले तुम्हाला...त्या मराठीचा एवढा मत्सर??
भाई, तुम्ही चुकताय ... तुम्ही साक्षात 'ज्ञानपीठा'ची उंचीच खुजी करून टाकलीत !
असे म्हणावेसे वाटते आहे. तमाम व अखिल मराठी साहित्यिकांनी आमचा इथला मराठी-कोकणी भाषिक संघर्ष किती विखारी आहे हे आवर्जून या उदाहरणावरून पहावे. तुम्हा आम्हाला किती कौतुक आहे कोकणी या रसाळ बोलीचे कारण मुळात ती मराठीची बोलीच आहे. आणि आपण मराठीच्या सर्वच बोलींवर निरतिशय प्रेम करणारी माणसं आहोत. पण दुर्दैवाने एका राजकीय षड् यंत्रामुळे गोव्यातली एक बोली राजभाषा बनली आणि चक्क माय मराठी मातेच्या मत्सराची वीषवल्ली फोफावत सुटली. आता आता तर जेवढा जास्त मराठीचा द्वेष तेवढे जास्त कोकणीचे प्रेम असे समीकरण झाले आहे हे खूप घातक आहे. दोन्ही भाषांच्या वादात इंग्लिश शिरजोर होऊन अतिक्रमण करते आहे हे या धुरिणांच्या लक्षात येत नाहीए की जाणूनबुजून काणाडोळा केला जातो आहे? सगळ्यांच प्रश्नांची छाननी अशा प्रसंगी करणे गरजेचे झाले आहे. वरून छान सर्जनशील नातेसंबंध ठेवतानाच इथे मराठीचा आतून आतून किती मत्सर होत असतो हेच या उदाहरणावरून लक्षात येते.
कोकणी साहित्य,कोकणी साहित्यिक याविषयी आम्हालाही खूप आदर आहे. परंतु मायमराठीचा सार्थ अभिमान हा तर आमचा श्वास आहे.भावबंधाची राखण जोखण कोकणी करते तर जगण्याला वैचारिकता,अभिजातता, मूल्यसंस्कार व चिंतनशीलतेची खोली आपल्याला मराठी देत आली आहे. या अभिजात भाषेविषयी केवळ तिरस्कार पेरून आपण नव्या पिढीच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहोत याचे भान या ज्येष्ठांना जरूर असलेच पाहिजे. भाषा,मग ती कोणतीही असो प्रेमच करायला शिकविते. तिरस्कार किंवा द्वेष नाही! 'सा विद्या या विमुक्तये'- अशी विद्या ,असे ज्ञान की जे मुक्त करते, अशी विद्येची,ज्ञानाची व्याख्या आहे. ज्ञानपीठ ही अशी सर्वोच्च संस्था आहे की ती भारतीय संस्कृतीतल्या 'ज्ञान' या सर्वोच्च मूल्याच्या पाठराखणीसाठी उभी आहे. कोकणी भाषा म्हणून मान्यता पावल्यानंतरचे दुसरे ज्ञानपीठ भाई मावजोंना मिळाले हे गोमंतकीय म्हणून आम्हां सर्वांनाच ललामभूत ठरले होते. आणि त्या ज्ञानपीठाने आपल्या मातास्वरूप भाषेच्या मत्सराला पाठबळ देऊन त्या 'ज्ञानपीठा'ची उंचीच खुजी करून टाकली आहे हा केवळ दुर्दैवयोग आहे व तो त्रिवार निषेधार्ह आहे असे म्हणावेसे वाटते. आम्ही अजूनही भाईंना खूप आदरपूर्वक व प्रेमपूर्वक विनंती करतो की त्यांनी एका भाषेचा सर्वोच्च पारितोषिक विजेता या नात्याने आपली चूक स्विकारून व सुधारून समन्वयाच्या दिशेने पाऊल टाकले तरच एक अनिष्ट पायंडा पडायचा टळेल व त्यांना मिळालेल्या 'ज्ञानपीठा'चा यथोचित आब राखला जाईल असे निश्चितपणे वाटते.