
देवगड : आपला कोकण हा जगात सर्वोत्तम आहे, हे जगानेही मान्य करायला हवे.इतके सुंदर काम करा, ‘कोकण सन्मान’ हा ‘कॉन्टेन्ट क्रिएटर्स’च्या हक्काचे व्यासपीठ आहे.तुम्हाला अजून प्रोत्साहन देण्यासाठी हे व्यासपीठ दिवसेंदिवस मोठं होत राहील. त्यामुळे कॉन्टेन्ट क्रिएटर्सने कोकणची संस्कृती, भाषा, खाद्य संस्कृती आणि कोकणचे अलौकिक सौंदर्य हे कोकणबाहेरीला जगाला दाखवत राहा.असे मत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी येथे व्यक्त केले. कोकण सन्मान सोहळ्याचे उद्घाटन उद्योजक प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते झाले.
पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतील कोकणातील डिजिटल निर्मात्यांना सन्मानित करणारा प्रतिष्ठेचा ‘कोकण सन्मान २०२५’ हा पुरस्कार सोहळा हॉटेल वेदा हॉलिडेज् येथे पार पडला.विविध श्रेणींतील उत्कृष्ट ब्लॉगर, छायाचित्रकार, रिल निर्माते, खाद्य संस्कृतीप्रेमी आणि उद्योजकांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. कोकण सन्मान सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते.
पुढे मंत्री नीतेश राणे म्हणाले, गोव्यामध्ये पर्यटन क्षेत्रात जरी मंदी आली असली तरी हीच वेळ आहे आपल्या कोकणाला जास्तीत जास्त प्रमोट करण्याची आहे. पर्यटनाच्यादृष्टीनेही कोकणासाठी हा महत्वाचा काळ आहे. क्रिएटर्सनी दर्जेदार कंटेंटच्या माध्यमातून कोकणचा गोडवा जगभर पोहोचवावा. कोकण सन्मानचा कणकवलीतून सुरू झालेला प्रवास आता देवगडपर्यंत आला आहे. हा प्रवास हळूहळू सिंधुदुर्गच्या इतर तालुक्यांमध्येही होईल. भविष्यात मुंबई, दुबईपर्यंतही आपण पोहोचू, एवढा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठी स्वप्ने पाहा. ती पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नीतेश राणे यांचे चिरंजीव कु. निमिश राणे उपस्थित होते.
यावेळी डिजिटल विश्वातील उत्कृष्ट प्रतिभांचा गौरव करण्यात आला. यात सर्वोत्कृष्ट ब्लॉगर पुरस्कार प्रणव धुरी यांना, सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार श्रेयस सावंत यांना, सर्वोत्कृष्ट फूड ब्लॉगर पुरस्कार योगिता’ज किचन यांना, सर्वोत्कृष्ट चाइल्ड इन्फ्लुएंसर पुरस्कार निधी वारंग यांना, सर्वोत्कृष्ट स्क्रिप्ट रिल्स निर्माता पुरस्कार विशाल घाडी यांना,सर्वोत्कृष्ट मालिका रिल्स पुरस्कार गोपी मालवणकर यांना, सर्वोत्कृष्ट डान्स रिल्स निर्माता पुरस्कार महेश जांभोरे यांना, सर्वोत्कृष्ट कॉमेडी रिल्स निर्माता पुरस्कार सौरेश कांबळी (बंटी) यांना, सर्वोत्कृष्ट जोडी पुरस्कार मंदार आणि मयुरी शेट्ये यांना, सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्रतीक स्पोर्टस् यांना मिळाला. चित्रपट ते रिल अशी विविध क्षेत्रे हाताळणारे विद्याधर कार्लेकर, उत्कृष्ट समाजसेवा करणारे दयानंद कुबल आणि कळसुत्री बाहुल्यांची लोककला जागतिक स्तरावर पोहोचवणारे परशुराम गंगावणे यांचा सत्कार पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. बंपर प्राईज विजेता समाधान यादव ठरला.यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्षा मिताली सावंत, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेविका तन्वी चांदोस्कर,भाजपचे देवगड प्रभारी संतोष किंजवडेकर, युवामोर्चाचे देवगड- जामसंडे शहरप्रमुख दयानंद पाटील, नरेश डामरी, वैभव बिडये, अंकिता प्रभू-वालावलकर, मनमित पेम, शंतनू रांगणेकर, ऋत्विक धुरी आणि गौरी पवार आदी उपस्थित होते.