CYBER CRIME | बक्षीस लागल्याचे सांगत चिपळूणातील तरुणीला ७८ हजारांचा 'ऑनलाईन गंडा'

सायबर क्राईमचा नवा फंडा उघडकीस !
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 18, 2023 09:57 AM
views 216  views

चिपळूण : गिफ्ट लागल्याचे सांगून चिपळुणातील एका तरुणीला तब्बल ७८,१८५ रुपयांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. सायली शंकर चिपळूणकर (२३, रा. नागावे-शंकरवाडी, ता. चिपळूण) असे तरुणीचे नाव आहे. 

        

याप्रकरणी रजत अग्रवाल (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागावे येथील सायली चिपळूणकर या तरुणीला मंगळवार, १४ मार्च राेजी फाेन आला. फाेनवर हिंदी भाषेतून संभाषण करत  'तुम्ही आमच्या रेग्युलर कस्टमर असल्याने तुम्हाला एसी, वन प्लसचा फाेन, लॅपटाॅप, टीव्ही, फ्रीज असे गिफ्ट लागले आहे. त्यातले तुम्हाला काय पाहिजे,’ अशी विचारणा केली.

      

सायलीने साेनीचा टीव्ही पाहिजे, असे सांगताच त्यासाठी तुम्हाला आमच्या कंपनीकडून अन्य काही खरेदी करावी लागेल, असे सांगण्यात आले. खरेदीचे पेमेंट युनियन बॅंकेच्या खात्यावर करा, असेही सांगण्यात आले.त्यानंतर सायलीने गुगल पे वरून पाचवेळा रुपये ट्रान्स्फर केले. ही रक्कम पाठविल्यानंतर काेणत्याही प्रकारची वस्तू देण्यात आली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायलीने अलाेरे पाेलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.