सावंतवाडी : ओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त आयोजित करण्यात आलेल्या नरकासुर स्पर्धेत आकाश मेस्त्री याने प्रथम क्रमांक, गावठाणवाडीने द्वितीय क्रमांक तर चौगुलेवाडीने तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच या स्पर्धेतील तारीवाडी, मेस्त्रीवाडी, रिद्धी सिद्धी ग्रुप, दशावतारी कलाकार आनंद गावकर, गुरु मळेकर यांचेही नरकासुर लक्षवेधी ठरले. यात गावठाणवाडीने सादर केलेला श्रीकृष्णाने केलेला नरकासुराचा वध या देखाव्याने रसिकांना अक्षरशः मोहिनी घातली. तर तारीवाडीचा जम्बो नरकासुर या स्पर्धेत यादगार ठरला. ओटवणे केंद्र शाळा नं. १ नजिक झालेल्या या नरकासुर स्पर्धेत ओटवणे सारख्या ग्रामीण भागात झालेल्या या स्पर्धेत एका पेक्षा एक असे सरस, हालते व दृक श्राव्य नरकासुर स्पर्धकांनी सादर करीत रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या नरकासुर स्पर्धेला ओटवणे पंचक्रोशीतील रसिकांनी गर्दी केली होती.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण गावठणवाडी कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, सामाजिक युवा कार्यकर्ते बबलू गावकर, आनंद मेस्त्री, बाळा गावकर, आनंद गावकर, एकनाथ गावकर, महेश गावकर, आनंद भैरवकर, बाबली उर्फ बाळा गावकर, रामा म्हैसकर, आनंद भैरवकर, सिद्धेश ओटवणेकर, मंगेश गावकर, नवीन भराडी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकांना ५००१ रुपये, ३००१ रुपये, २००१ रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल रसिकांनी समाधान व्यक्त केले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लिंगोजी सुतार, बाळू पनासे, बाळा गावकर, गोटया गावकर, मनोज शेट्टी यानी काम पाहिले. या स्पर्धेचे नियोजन उदित गावकर, प्रथमेश गावकर, प्रमोद गावकर, सुनिल गावकर, गजानन गावकर, प्रणव गावकर, विशाल गावकर, तुषार गावकर, ऋषिकेश गावकर, देविदास गावकर, देवेश भैरवकर यानी केले.