
वेंगुर्ले : शासनाने १४ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या मातोंड महसूल मंडळातील (मातोंड, पाल, होडावडा, तुळस) गावातील शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे तालुका कृषी कार्यालयाकडे तात्काळ जमा न झाल्यास २९ ऑक्टोबर रोजी विमा कंपनीविरोधात आचारसंहितेचा मान राखून तालुका कृषी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
वेंगुर्ला तालुक्यात एकूण ५ मंडळ असून त्यापैकी दोन मंडळांना पीक विमा नुकसान भरपाई १४ ऑक्टोबरला जमा झाली. परंतु वेंगुर्ले व वेतोरे या मंडळापुरती जमा झाली आहे. उर्वरित मातोंड, शिरोडा, म्हापण या तीन मंडळांना अद्याप नुकसान भरपाई जमा झालेली नाही. मातोंड महसूल मंडळातील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत. ही रक्कम तात्काळ तालुका कृषी कार्यालयाकडे जमा न झाल्यास २९ रोजी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय, दिगंबर शेटकर, उत्तम नाईक, प्रदीप सांवंत, सुभाष दळवी, जगु परब, मेघः श्याम भगत, प्रल्हाद राणे आदींच्या सह्या या निवेदनावर आहे.