
दापोली : राष्ट्रवादी पक्षाने सर्वांना भरभरून प्रेम सन्मान व विकासकामे दिली आहेत तरीही जे पक्ष सोडून जात आहेत त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत. जनतेला सर्व काही माहिती असून त्यांच्या निवडणूकीच्या वेळी जनता त्यांना उत्तर देईल असे मत राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीतील संभाव्य बंडखोरी बाबत व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे दापोली दौऱ्यावर आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, दापोलीत नगरपंचायतीतील सात नगरसेवक व अन्य पदाधिकारी हे पक्ष सोडून जात असल्याचे निर्णय दुर्दैवी असून आपण त्यांना सर्वकाही दिले होते. आपली राष्ट्रवादीच्या मतदारांवर पूर्ण पणे खात्री असून यापुढे राष्ट्रवादी अधिक बळकट कशी होईल? त्यासाठी आपण निश्चितच काळजी घेऊ. राष्ट्रवादीमध्ये विधानसभा निवडणुकीत दापोली मतदार संघात कोणतीही बंडखोरी होणार नाही. पक्षशिस्त ही निश्चितच पाळली जाईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रामध्ये महायुती निश्चितच विजयी होईल असे सांगताना लोकसभा निवडणुकीत जे विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवला होता त्याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीत होणार नाही असे सांगतानाच प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या मुद्द्यांवर लढवली जाते. लाडकी बहीण लाडका भाऊ अशा विविध योजना राज्य सरकारने अंमलात आणल्या असून समाजातील प्रत्येक घटकाला खुश करण्याचे प्रयत्न केला आहे त्यामुळे जनतेला हे सरकार आपले सरकार वाटू लागले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जागावाटप संपूर्णपणे पूर्ण होत आले असून गुहागरची जागा कोणाची याबाबत आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणार असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरलेल्या जरांगे फॅक्टर बाबत याही निवडणुकीत तो फॅक्टर चालेल का असे विचारल्यावर त्यांनी मनोज जरांगे यांचे आंदोलन हे मराठा समाजासाठी असून त्या आंदोलनाला राजकारणाशी जोडणे चुकीचे ठरेल असे सांगत त्यांनी याबाबत सावध पवित्रा घेतला.
दापोलीतील कुणबी भवनाचा प्रश्न हा शिवसेना व भाजप यांनी सोडवला असला तरी जी शासकीय जागा या समाजाच्या मातृसंस्थेला मिळायला पाहीजे याची फाईल मंत्रालयात आली असून आपण समाजातील विविध मान्यवरांना सोबत घेऊन ही जागा समाजाला मिळण्यासाठी आगामी काळात निश्चितच प्रयत्न करू आपण पुढील काळात दापोली मतदार संघाच्या दौऱ्यावर निश्चित येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगतानाच रायगड व रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील विधानसभेच्या सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यामध्ये अनेक नाराज कार्यकर्ते गायब झाल्याचे दिसून आल्याने सर्वत्र त्यांच्या पक्षबादलाची चर्चा होती तर विरोधी पक्षाचे उमेदवार संजय कदम यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही पदाधिकारी उपस्थित होते तेही राष्ट्रवादी च्या आजच्या बैठकीत सामील झाले होते त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका अधिक स्पष्ट होणे गरजेचे बनले आहे.