शेखर निकम २८ ला उमेदवारी अर्ज दाखल करणार !

Edited by: मनोज पवार
Published on: October 26, 2024 10:08 AM
views 225  views

चिपळूण  :  विधानसभा निवडणुकीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला सुटली असून महायुतीतर्फे आमदार शेखर निकम यांच्या नावाची घोषणा झाली आहे.  महायुतीतर्फे सोमवार दि. २८ रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, याबाबतची  माहिती आ. निकम यांनी चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या पाच वर्षात लोकांची केलेली  विकासकामे आणि  जनतेची भक्कम पाठींबा या सगळ्यांच्या जोरावर या निवडणुकीत आपण नक्कीच विजय संपादन करू, असा विश्वास आ. शेखर निकम यांनी यावेळी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, महिला आघाडी शहराध्यक्ष सौ. आदिती देशपांडे, माजी सभापती सौ. पूजा निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. दिशा दाभोळकर, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, महायुतीतर्फे सोमवार दि. २८ रोजी सकाळी १०.३० वाजता महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता या सर्वांच्या उपस्थितीत आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण, माजी आमदार सदानंद चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), भाजप, रिपाई (आठवले गट) तालुकाध्यक्ष, महिला आघाडी तालुकाध्यक्षा, सर्व सेल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सोमवार दि. २८ रोजी सकाळी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चिपळूण परिषदे समोरील व वेस मारुती मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले जाईल यानंतर प्रांत कार्यालयापर्यंत रॅलीने जाऊन महायुतीचे नेते पदाधिकारी यांच्या समवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत, अशी माहिती आ. शेखर निकम यांनी यावेळी दिली.

यावेळी ते आणखी पुढे म्हणाले की, आपला उमेदवारी अर्ज भरण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. उत्स्फूर्तपणे लोकं येतील असा आपल्याला विश्वास आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत थोडक्यात मताने पराभव झाला. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय झाला. या मतदारसंघात आतापर्यंत कोणाला मताधिक्य मिळाले नव्हते, तेवढे मताधिक्य मागच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मिळाले, असा दावा निकम यांनी यावेळी व्यक्त केला. मागील पाच वर्षाच्या कारकिर्दीत आपण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. जनसंपर्क, लोकांची केलेली कामे, महापूर काळात केलेली कामे या सगळ्यांच्या जोरावर या निवडणुकीत आपण नक्कीच विजय संपादन करू, असा विश्वास आमदार निकम यांनी व्यक्त केला.

शिवसेना उपनेते, माजी आमदार सदानंद चव्हाण नाराज असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सदानंद चव्हाण या निवडणुकीत ताकतीने उतरतील. तसेच शिवसेना शिंदे गट पदाधिकारी व कार्यकर्ते याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते रिपाई आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वचजण ताकतीने निवडणूक प्रचार करतील, असा विश्वास आमदार निकम यांनी यावेळी व्यक्त केला. सन २०१९ च्या निवडणुकीत सर्वपक्षीय मतदारांनी सहकार्य केले होते. त्याचप्रमाणे या निवडणुकीत देखील आपल्याला सर्व सहकार्य होईल, असा दावा निकम यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. कोणाचे जे समज- गैरसमज असतील ते दूर करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.