
सावंतवाडी : येथील सावंतवाडी आगारातून सकाळी सव्वा नऊ वाजता सुटणाऱ्या सावंतवाडी सोनुर्ली बस फेरीच्या वेळेत एसटी प्रशासनाने अचानक बदल केल्याने शालेय विद्यार्थ्यी व प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे सदरची बस फेरी पूर्वीच्याच वेळेत पूर्ववत सुरू करा अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर यांनी स्थानक प्रमुख आर एन कांबळी यांच्याजवळ आज निवेदनाव्दारे केली.
सोनुर्ली गावात गेल्या वर्षापासून सावंतवाडी बस स्थानकातून सकाळच्या वेळेत सव्वानऊ वाजता सोडण्यात येणाऱ्या एसटी बस फेरीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नव्हता सदरची बस ही शालेय विद्यार्थी तसेच सावंतवाडी बाजारपेठेत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांसाठी फायद्याची व सोयीची ठरत होती सोनुर्ली गावातील विद्यार्थी हायस्कूल साठी जाण्यासाठी याच बस फेरीचा वापर करतात तसेच जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सावंतवाडी मध्ये कॉलेज साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बस महत्त्वाची ठरते मात्र अलीकडे या बसची वेळ बदलून ती पावणेदहा अशी करण्यात आली आहे अर्धा तास उशिराने सोडणारी ही बस सावंतवाडी मध्ये वेळेत पोहोचत नाही त्यामुळे विद्यार्थी वर्ग तसेच अन्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. त्यामुळे ही बस पूर्वीच्याच वेळेत सव्वानऊ वाजता सावंतवाडीतून सोडण्यात यावी अशी मागणी उपसरपंच श्री गावकर यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
उपसरपंच श्री गावकर यांच्या म्हणण्यानुसार कुठलीही ग्रामपंचायतला पूर्वकल्पना न देता या बसचा वेळ बदलण्यात आलेला आहे वारंवार या संदर्भात स्थानक प्रमुख तसेच कणकवली कार्यालयातील वरिष्ठांकडे यासंदर्भात मागणी करूनही एसटीचा वेळ बदलण्यात आलेला नाही. त्यामुळे आज निवेदनातून पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे दिवाळीनंतर बस फेरी पूर्वीच्या वेळेनुसार सोडण्यात येण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. मात्र दिवाळीनंतर ही बस वेळेत न आल्यास विद्यार्थी व ग्रामस्थांना घेऊन स्थानकामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे.