
चौकशी करून कारवाईची मागणी
सिंधुदुर्गनगरी : देवगड येथे सुरू असलेल्या बीएलओ (BLO) विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रशिक्षण वर्गादरम्यान प्रांताधिकारी यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांशी कथितरित्या आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवगड येथे बीएलओंसाठी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. सकाळी शाळेत गेलेले शिक्षक प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिले होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेले प्रशिक्षण दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू असल्याने काही शिक्षकांनी प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याचे सांगून अल्प विश्रांतीची मागणी केली होती.
यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी शिक्षकांशी असभ्य व अपमानास्पद भाषेत संवाद साधल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. नवपीढी घडविणाऱ्या शिक्षकांचा अवमान करण्यात आल्याचा दावा करत संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, बीएलओ कामासाठी नियुक्त कर्मचारी व शिक्षकांशी संबंधित अधिकारी सातत्याने उद्धट आणि अवमानकारक वर्तन करीत असल्याने देवगड तालुक्यातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन सादर करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास येत्या काळात कर्मचारी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
...अन्यथा कर्मचारी संघटना आंदोलन छेडणार
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस राजन वालावलकर ,शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,राज्य पदाधिकारी सचिन मदने व नामदेव जांभवडेकर ,देवगड अध्यक्ष जयेंद्र चव्हाण ,संदिप मिराशी ,कणकवली अध्यक्ष सुशांत मर्गज ,कुडाळ शिक्षक नेते प्रसाद वारंग ,जगदीश गोगटे,श्रीकृष्ण कांबळी आदी मान्यवर










