दाहक वास्तव - सत्य परखड भाषेत मांडल्याने नारायण सुर्वेंची कविता अभिजात दर्जाची : संध्या तांबे

Edited by: विनायक गावस
Published on: February 01, 2026 11:02 AM
views 12  views

सिंधुदुर्गनगरी : आपल्या कवितेतून जीवनात भोगलेले दाहक वास्तव आणि सामाजिक सत्य परखड व थेट भाषेत मांडल्यामुळेच कवी नारायण सुर्वे यांची कविता अभिजात दर्जाला पोहोचली, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांनी येथे केले.

कवी नारायण सुर्वे यांच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाच्या अकराव्या मासिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ओरोस येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत घुंगुरकाठीचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी केले.

सुमारे तासभर चाललेल्या आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात संध्या तांबे यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या कवितेतील सामाजिक आशयाचा सखोल आढावा घेतला. अनाथ म्हणून जन्मलेले नारायण सुर्वे यांनी गिरणगावात अत्यंत हलाखीचे व कष्टमय जीवन जगले. गिरणी कामगार गंगाराम सुर्वे आणि त्यांची पत्नी काशीबाई यांनी त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले; मात्र गरिबीमुळे चौथीपर्यंतच शिक्षण देता आले. गंगाराम सुर्वे निवृत्तीनंतर हेत (वैभववाडी) येथे परतल्यावर दहाबारा वर्षांचा नारायण पुन्हा एकदा अनाथ झाला.

हामाली, हरकाम्या अशी विविध कामे करत त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे ते पालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून रुजू झाले. १९६१ मध्ये नायगाव येथील शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते ‘गिरणगावचे सुर्वे मास्तर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

हा प्रवास अत्यंत खडतर असल्याचे सांगताना संध्या तांबे म्हणाल्या की, परळच्या चाळीतील वास्तव, झोपडपट्टीतील जीवन, गरीबी, अवहेलना व उपेक्षा यांचे चटके सुर्वे यांनी प्रत्यक्ष अनुभवले. गिरणगावातील कष्टकरी कामगारांचे दुःख त्यांनी जवळून पाहिले. हेच भोगलेले वास्तव त्यांनी आपल्या कवितेतून थेट, निर्भीड भाषेत मांडले.

१९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घेतले आणि या संग्रहाला शासनाचा पुरस्कारही मिळाला. याच काळात ते साम्यवादी विचारसरणीकडे वळले. ‘कामगार आहे मी, तळपती तलवार आहे; सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे’ अशा ओळींतून त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला थेट आव्हान दिले. त्यांच्या पुढील लेखनातून शोषित, कामगार, शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया आणि दारिद्याने पिचलेला निम्नवर्गीय समाज यांचे दाहक दु:ख सातत्याने प्रकट होत राहिले. त्यामुळेच त्यांची कविता काळाच्या पलीकडे जाऊन अमर ठरली, असे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात सतीश लळीत यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करताना सांगितले की, अनाथपण, हामाली व घरगडीची कामे करणारा हा कवी आपल्या प्रतिभेच्या जोरावर मराठी सारस्वतात मानाचे स्थान प्राप्त करतो. साठोत्तरी मराठी कवितेवर सुर्वे यांचा अमीट ठसा आहे. १९९८ मध्ये शासनाने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले, तर २००४ मध्ये मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार प्रदान केला. १९९५ साली परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. नारायण सुर्वे यांच्या कवितेशिवाय मराठी साहित्याची कल्पनाच करता येणार नाही, असे ते म्हणाले.

कार्यक्रमात नारायण सुर्वे यांच्या मुलाखतीची संग्रहित चित्रफीत मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली. यावेळी डॉ. सई लळीत, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, ॲड. सुधीर गोठणकर उपस्थित होते. पुरुषोत्तम लाडू कदम व मनोहर सरमळकर यांनी सुर्वे यांच्या कविता सादर केल्या. लंडनमध्ये वास्तव्याला असलेल्या आणि मूळ ओरोस येथील अभया पुरुषोत्तम कदम हिनेही सुर्वे यांची कविता सादर करून कार्यक्रमाला रंगत आणली.