शेतकरी परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी गणपत चव्हाण यांची युरोपसाठी निवड

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 01, 2026 12:10 PM
views 18  views

कणकवली : राज्य कृषी विभागामार्फत आयोजित यंदाच्या शेतकरी परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत उर्फ भाई चव्हाण यांची युरोप गट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. १५ ते २८ फेब्रुवारी असा हा एकूण १४ दिवसांचा अभ्यास दौरा आहे. या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी ६  गटांमध्ये राज्यातील एकूण १८० शेतकऱ्यांची निवड झाली होती. यापैकी युरोप दौऱ्यासाठी राज्यातील ५५ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. पैकी ४१ शेतकऱ्यांनी स्वारस्य दाखविले. युरोप व्हिसा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या ४१ शेतकऱ्यांची अंतिम निवड युरोप दौऱ्यासाठी झाली आहे. 

या दौऱ्यामध्ये युरोप समुहातील फ्रान्स, स्विझर्लड, जर्मनी आणि नेदरलँड्स या देशांतील आधुनिक तंत्रज्ञानांवर आधारित फलोत्पादन, दुग्धोत्पादन, पक्रिया, बीज पक्रिया आदींशी संबंधित मान्यवर विद्यापीठांना भेटी देऊन माहिती घेण्यात येणार आहे. कृषी विभागाने या परदेशी दौर्यांतील ज्ञानाचा उपयोग संबंधित शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील शेतकऱ्यांना करुन देण्याच्या उद्देशाने ६ परदेशी गटांमधून या दौर्याची आखणी केली आहे. या दौऱ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ५ शेतकर्यांची वेगवेगळ्या गटांतून निवड झाली आहे. यापैकी काही शेतकरी गट या अभ्यास दौर्यासाठी यापुर्वीच रवाना झाले आहेत.