
सिंधुदुर्गनगरी. : सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निधी संकलनात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच तब्बल 105.81 टक्के निधी संकलित करत जिल्ह्याने राज्यातही आपली छाप उमटवली आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनातून जिल्ह्याने हे यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना 10 डिसेंबर रोजी मुंबईतील राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यास 41.45 लाखांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हा प्रशासन, सैनिक कल्याण विभाग, विविध शाळा–महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागातून जिल्ह्याने तब्बल 43 लाख 65 हजार इतका निधी गोळा करत उत्कृष्टता सिद्ध केली.
या यशात निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सहायक सैनिक कल्याण अधिकारी उमेश आईर, तसेच सैन्य कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचार्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शिक्षण संस्थांनी, कार्यालयांनी व सर्व स्तरांवरील अधिकारी–कर्मचार्यांनी दाखवलेले समर्पण व देशभक्तीचे भाव खरोखरच अनुकरणीय ठरले.











