
दोडामार्ग : पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे तसेच दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात अखेर डायलिसिस सेंटर सुरू होत आहे.
3 डिसेंबर पासून मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार असून यामुळे तालुक्यातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सेवेसाठी प्रथम प्राधान्य तालुक्यातील रुग्णांना दिले जाणार आहे.
मंगळवारी संबंधित डायलिसिस कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर व नेफरॉलॉजिस्ट डॉ. घोगळे यांच्यासोबत दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुपचे वैभव इनामदार, पंकज गवस, भूषण सावंत, कृष्णा दळवी, दिव्या देसाई, संदेश देसाई यांनी रुग्णालयात भेट घेऊन चर्चा केली. रुग्णांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये याबाबत सूचना देत त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
डायलिसिस संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात जाऊन “आरोग्य मित्र” यांच्याकडून आवश्यक माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.










